मुंबई - मुंबईकरांवर पार्किंगसाठी दंड लावला जात असताना मुंबईच्या महापौरांनी नो पार्किंगमध्ये आपले वाहन उभे केल्याचे उघड झाले होते. याप्रकरणी, टिकेची झोड उठल्यानंतर वाहतूक पोलिसांनी महापौरांकडून दंड वसुलीसाठी ई-चलन पाठवले असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे शासकीय वाहन विलेपार्ले पूर्व कोलडोंगरी येथील नो पार्किंगच्या फलकाजवळ उभे केले होते. एकीकडे मुंबईकरांवर पार्किंगबाबत शिस्त लावण्यासाठी पार्किंग शुल्क आकारले जात आहे. मात्र, मुंबईच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौरांना मात्र, हा नियम लागू नसल्याचे चित्र यामुळे निर्माण झाले. नागरिकांवर कर लावला जात असताना महापौरांनी आपले वाहन नो पार्किंगमध्ये उभे केल्याने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे.
शिस्त ही नागरिकांबरोबर महापौरांनीही पाळली पाहिजे. महापौरांकडूनही दंड वसूल केला पाहिजे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते रवी राजा व राष्ट्रवादीच्या गतनेत्या राखी जाधव यांनी दिली आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने महापौरांच्या वाहनाला ई-चलन पाठवले आहे. आता हा दंड महापौर कधी भरतात याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.