मुंबई -मोदी सरकारच्या काळात विरोधीपक्ष तसेच काही पत्रकारांवर नजर ठेवण्यासाठी पेगॅसस सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला. या सॉफ्टवेअरच्या आधारे विरोधी पक्षनेते आणि काही निवडक पत्रकारांवर केंद्र सरकार नजर ठेवत असल्याचा खळबळजनक आरोप आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने केला आहे. याचे पडसाद आता महाराष्ट्रतही उमटू लागले आहेत. दरम्यान, राज्यात देवेंद्र फडवणीसांचे सरकार असताना या सॉफ्टवेअरचा वापर केला गेला होता का, याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
'पेगॅसस कांड महाराष्ट्रात ही झाले का?' -
महाराष्ट्रात या आधीच फडणवीस सरकारच्या काळातील रश्मी शुक्ला यांच्या माध्यमातून अनधिकृत फोन टॅपिंगचे प्रकरण समोर आले होते. परंतु पेगॅसस सॉफ्टवेअरच्या वापराच्या बातम्याही येत आहेत. त्यामुळे पेगॅससचा वापर महाराष्ट्रातही झाला का, याची चौकशी महाविकास आघाडी सरकारने करावी, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे. तसेच डीजीआयपीआरचे अधिकारी कोणाच्या परवानगीने इस्त्रायल ला गेले, त्यांनी तेथे कोणते प्रशिक्षण घेतले, परत येऊन अहवाल दिला का, या दौऱ्याचा पेगॅससशी संबंध आहे का, असे प्रश्नही सचिन सावंत यांनी उपस्थित केले आहे. निवडणूक काळात प्रचाराचे काम सोडून असे दौरे होणं आश्चर्यकारक व संशयास्पद आहे. यासंबंधी चौकशी होणे गरजेचे आहे. तसेच कोणते अधिकारी कितीवेळा इस्त्रायल गेले, एनएसओसोबत शासकीय बैठका झाल्या होत्या का, एनएसओशी कोणता पत्रव्यवहार झाला होता का, ही सर्व माहिती समोर आली पाहिजे, असेही सचिन सावंत म्हणाले.