महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चिंताजनक! 'हा' आजार करतोय कोरोनाग्रस्त मुलांचे अवयव निकामी - पीएमआयएस आजार मुंबई

हा आजार मुलांसाठीचा सर्वात घातक आजार आहे. यात मेंदू, हृदय, किडनी, फुप्फुस निकामी होत असल्याने हा आजार जीवघेणा ठरत आहे. त्यामुळे कोरोना होऊ नये, यासाठी मुलांची योग्य ती काळजी घ्या. पण एखाद्या मुलाला कोरोनाची लक्षणे दिसल्याबरोवर त्याला वेळेत डॉक्टरांकडे नेत त्याच्यावर उपचार करणे गरजेचे आहे. अन्यथा कोरोनाच्या संसर्गाचे घातक दुष्परिणाम या आजाराच्या रुपाने मुलांवर होण्याची शक्यता आहे.

pediatric multisystem inflammatory syndrome  pediatric multisystem inflammatory syndrome patietns  पेडिएट्रिक मल्टिसिस्टीम इंफ्लेमॅटरी सिंड्रोम रुग्ण  पीएमआयएस आजार मुंबई  लहान मुलांमधील पीएमआयएस आजार
पीएमआयएस आजार

By

Published : Jul 22, 2020, 3:29 PM IST

मुंबई - गेल्या महिन्याभरापासून मुंबईसह देशात अनलॉकमध्ये लहान मुलांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढत आहे, तर कावासाकी आजाराचेही रुग्ण आढळत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र, आता या चिंतेमध्ये आणखी भर पडणार असल्याचे चित्र आहे. कारण कोरोनाग्रस्त लहान मुलांना आता आणखी एका दुर्मीळ आजाराने ग्रासण्यास सुरुवात केली आहे. पेडिएट्रिक मल्टिसिस्टीम इंफ्लेमॅटरी सिंड्रोम (PMIS) असे या आजाराचे नाव असून हा आजार मुलांचे विविध अवयव निकामी करत त्यांच्या जीवाला मोठा धोका निर्माण करत आहेत.

या आजारावर वेळीच उपचार झाले नाही तर, मुलांचा मृत्यूही होत आहे. मुंबईतील वाडिया रुग्णालयात एक, तर मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयात या आजाराचा एका संशयित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या वाडियात असे 21 मुले उपचार घेत आहेत. आतापर्यंतचा लहान मुलांसाठी हा सर्वात घातक-जीवघेणा आजार असल्याचे म्हणत मुलांची योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला बालरोग तज्ज्ञांनी दिला आहे.

कोरोनाची लागण झालेल्या 6 महिने ते 14 वर्षांपर्यंतच्या मुलांना दोन ते तीन आठवड्यांनंतर ताप येत आहे. त्यानंतर अंगावर चट्टे येत असून पुढे त्याचा मोठा दुष्परिणाम रुग्णांच्या अवयवांवर होत आहे. फुफ्फुस, हृदय, किडनी, मेंदू, धमन्या असे अवयव हा आजार निकामी करण्यास सुरुवात करतो. त्यामुळे लक्षणे दिसल्याबरोबर या आजाराचे निदान होणे आणि त्यावर उपचार होणे गरजेचे आहे. अन्यथा ही मुले थेट व्हेंटिलेटरवर जात असून त्यांचा जीव धोक्यात येत असल्याची माहिती वाडिया रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनी बोधनवला यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे. कुठलाही संसर्ग झाल्यानंतरचा पुढचा टप्पा किंवा त्या संसर्गाचे पुढचे दुष्परिणाम म्हणजे हा आजार असल्याचेही त्या सांगतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग झालेल्या मुलांमध्ये PMIS आजाराच्या रुपाने हे दुष्परिणाम दिसून येत आहेत.

21 जुलैपर्यंत वाडियात असे 18 रुग्ण दाखल झाले होते, तर एका दिवसातच आणखी 3 रुग्णांची भर पडली असून आता हा आकडा 21वर गेल्याचेही बोधनवला यांनी सांगितले. यातील एक रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्याबरोबर दगावला. कोरोनाचा संसर्ग झालेल्यांना हा आजार होत असल्याने पालकांनी मुलांवर बारीक लक्ष ठेवावे. जराही ताप आला किंवा अंगावर चट्टे आले की, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असेही आवाहन बोधनवाला यांनी केले आहे.

वाडियाबरोबरच नायर रुग्णालयातही असे दोन रुग्ण आढळले आहेत. मात्र, हे रुग्ण संशयित असून यातील एकाचा मृत्यू झाल्याची माहिती नायरच्या बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. सुषमा मलिक यांनी दिली. एका रुग्णावर उपचार सुरू असून हा नक्की PMIS आजारच आहे का? याचे निदान सुरू असल्याचेही डॉ. मलिक यांनी सांगितले आहे. हा आजार मुलांसाठीचा सर्वात घातक आजार आहे. यात मेंदू, हृदय, किडनी, फुप्फुस निकामी होत असल्याने हा आजार जीवघेणा ठरत आहे. त्यामुळे कोरोना होऊ नये यासाठी मुलांची योग्य ती काळजी घ्या. पण एखाद्या मुलाला कोरोनाची लक्षणे दिसल्याबरोवर त्याला वेळेत डॉक्टरांकडे नेत त्याच्यावर उपचार करणे गरजेचे आहे. अन्यथा कोरोनाच्या संसर्गाचे घातक दुष्परिणाम या आजाराच्या रुपाने मुलांवर होण्याची शक्यता आहे. या आजाराविषयी आयसीएमआरला माहिती कळवण्यात आली असून यावर अजून अभ्यास सुरू असल्याची माहिती डॉ. बोधनवाला यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details