मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीचं शिवसेनेला पाठिंब्याचं पत्र न मिळाल्यामुळे शिवसेनेची अडचण झाली. शिवसेना नेत्यांनी सोमवारी राजभवनावर जाऊन राज्यपालांकडे मुदतवाढ मागितली, पण राज्यपालांनी नकार दिला. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आजची ऐतिहासिक भेट निष्फळ ठरली आहे.
काँग्रेसच्या दिरंगाईने पवार-ठाकरे यांची ऐतिहासिक भेट ठरली निष्फळ !
राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीचं शिवसेनेला पाठिंब्याचं पत्र न मिळाल्यामुळे शिवसेनेची अडचण झाली.
राज्यातील सत्तास्थापनेच्या पेचप्रसंगाबाबत आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसची 11 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बैठक झाली. बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी 'आम्ही काँग्रेससोबत बसून तोडगा काढत असून निर्णय झाल्यानंतर राष्ट्रवादी आपली भूमिका स्पष्ट करेल, असे सांगितले. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यात वांद्र्यातील हॉटेल ताज लँड येथे बैठक पार पडली. यावेळी पवार व ठाकरेंमध्ये जवळपास २० मिनिटे सध्याच्या परिस्थितीवर व सर्व पर्यायांवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. बैठकीत उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा देण्याची विनंती केल्याचे समजते.
बैठकीनंतर शिवसेनेला समर्थन देण्याबाबत काँग्रेस पक्षाने भूमिका स्पष्ट केली नाही. दरम्यान राज्यपालांनी शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी सोमवारी ७ वाजून ३० मिनिटापर्यंतची वेळ दिली होती. मात्र काँग्रेसने आपण उद्या राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे पत्र जारी केले. त्यामुळे पवार-ठाकरे यांची ऐतिहासिक भेट निष्फळ ठरली आहे.