मुंबई - रिया चक्रवर्तीने सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी आपली लिखित याचिका गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाला सादर केली. यामध्ये पाटणा पोलिसांनी 25 जुलैच्या एफआयआरला ‘झिरो एफआयआर’ मानून हे प्रकरण मुंबई पोलिसांकडे हस्तांतरित करावे, असे याचिकेत म्हटले आहे. सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांनी आपल्यावर निराधार आरोप केले आहेत, असेही रियाने यामध्ये म्हटले आहे.
याअगोदर रियाने सर्वोच्च न्यायालयात हस्तांतरण याचिका दाखल केली होती. पाटणाहून मुंबईला हे प्रकरण हस्तांतरित करण्याविषयी यामध्ये मागणी केली होती. यावरील आपला निर्णय न्यायालयाने सुरक्षित ठेवला आहे.
बिहारमध्ये चौकशी पूर्णपणे अवैध आहे - रिया
या एफआयआरचा पाटणामधील कोणत्याही गुन्ह्याशी काहीही संबंध नाही, असे या याचिकेमध्ये रियाने म्हटले आहे. याप्रकरणी, एक ‘झिरो एफआयआर’ पाटणामध्ये दाखल करून हे प्रकरण मुंबई पोलिसांच्या अधिकारक्षेत्रात हस्तांतरित करावे, असे रियाने पुढे म्हटले आहे.
या प्रकरणाची बिहारमध्ये चौकशी होणे, हे पूर्णपणे अवैध आहे आणि ही अवैध कार्यवाही सीबीआयला हस्तांतरित करता येणार नाही, असे तिने याचिकेत म्हटले आहे. तसेच, हे प्रकरण सीबीआयकडे हस्तांतरित केल्यास आपल्याला काही हरकत नसल्याचेही तिने पुढे म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्वतःच्या अधिकाराचा वापर करून हे प्रकरण सीबीआयला सोपवले आपल्याला हरकत नसल्याचे तिने म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने संविधानाच्या आर्टिकल 142 च्या अंतर्गत न्यायालयाच्या अधिकाराचा वापर करून हे प्रकरण सीबीआय चौकशीसाठी हस्तांतरित केले, तर याचिकाकर्त्याला काही हरकत नसल्याचे या याचिकेत म्हटले आहे. मात्र, बिहार पोलिसांनी सीबीआयमध्ये स्वतःच्या तपासाचे अधिकारक्षेत्राशिवाय हस्तांतरण केले, असे करणे कायद्याच्या विरोधात असल्याचे यात म्हटले आहे.