मुंबई- दिल्लीतील 'एम्स'च्या धर्तीवर महापालिका रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना 40 टक्के सवलतीच्या दरात औषधे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका रुग्णालयात औषधालये सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी अमृतधारा या संस्थेची निवड केली आहे, अशी माहिती मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली.
पालिका रुग्णालयात 'एम्स'च्या धर्तीवर मिळणार स्वस्त औषधे - महापालिका रुग्णालय
दिल्लीतील 'एम्स'च्या धर्तीवर महापालिका रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना 40 टक्के सवलतीच्या दरात औषधे उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली आहे. याबाबतच्या प्रस्तावाला काल (बुधवार) झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत बहुमताने मंजुरी देण्यात आली.
महापालिकेच्या केईएम, सायन, नायर या तीन प्रमुख रुग्णालयांसह 16 उपनगरीय रुग्णालये असून त्यावर रुग्णांचा मोठा भार आहे. या रुग्णालयांमध्ये राज्यातील कानाकोपऱ्यांतून मुंबईतील चाळी, झोपडपट्टी भागातील गरीब रुग्ण मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यांची आर्थिक स्थिती बेताची असल्याने उपचारासाठी औषधांचा खर्च त्यांना परवडणारा नसतो. त्यामुळे बहुतांश रुग्ण पालिकेच्या रुग्णालयात दाखल होतात. मात्र, उपचार स्वस्त होत असले तरी डॉक्टरांकडून बाहेरील महागड्या दरातील औषधे खरेदी करण्यास सांगितले जाते. महापालिका सभागृहात याचे पडसाद उमटले होते. महापालिका आयुक्तांनी याची दखल घेत डॉक्टरांना स्वस्त व वेळेत औषधे देण्याचे निर्देश दिले. मात्र, डॉक्टरांकडून अंमलबजावणी केली जात नव्हती.
प्रशासनाने याला चाप लावण्यासाठी आणि रुग्णांना मदत व्हावी म्हणून सवलतीत औषधे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने पालिकेच्या सर्वच रुग्णालयात अशी औषधालये सुरू केली जाणार आहेत. बुधवारी (दि. 20 नोव्हें) याबाबतच्या प्रस्तावाला गटनेत्यांच्या बैठकीत बहुमताने मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे रुग्णांना दिलासा मिळणार आहे.