महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आजपासून शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मिळणार मोफत रक्त

राज्यात आजपासून सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त मिळणार आहे. याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. या संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.

Patients To Get Free Blood During Their Treatment At Government Hospitals
आजपासून शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मिळणार मोफत रक्त

By

Published : Dec 12, 2020, 6:16 AM IST

मुंबई - राज्यात आज (शनिवार ता. १२) पासून सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त मिळणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. या निर्णयानुसार आजपासून शासकीय रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांना रक्त आणि रक्तातील घटक मोफत दिले जाणार आहेत.

मोफत रक्त -
राज्यात रक्ताचा तुटवडा आहे. रक्त तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण येथे राज्य रक्तसंक्रमण परिषदेच्या माध्यमातून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी बोलताना, ‘आधी केले मग सांगितले’ या उक्तीनुसार आरोग्यमंत्री टोपे यांनी रक्तदान करून त्याद्वारे नागरिकांना रक्तदान करण्याचा संदेश दिला. यावेळी आरोग्यमंत्री म्हणाले, शासकीय रुग्णालयात रक्तावरील प्रकियेसाठी ८०० रुपये शुल्क आकारले जाते. आता शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या रुग्णाला रक्ताची गरज भासल्यास त्याला मोफत रक्त उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याबाबतचा शासन निर्णय आज प्रसिद्ध करण्यात आला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले.

राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या अखत्यारीत ३४ रक्त पेढ्या कार्यरत आहेत. या रक्त पेढ्यांच्या माध्यमातून १.५ लाख रक्त पिशव्या संकलीत करून गरजू रुग्णांना दिल्या जातात. २७ एप्रिल २०१५ च्या परिपत्रकानुसार रक्तासाठी दर निश्चित करण्यात आले होते. सध्या कोरोनाच्या परिस्थितीत रक्त आणि रक्तातील घटक रुग्णांना गरजेचे आहेत. यासाठी आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग यांची वैद्यकीय महाविद्यालये व शासकीय रुग्णालयात भरती असणाऱ्या रुग्णांना रक्त व रक्तातील घटक मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून शनिवार १२ डिसेंबरपासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

रक्तदानाचे आवाहन -
एखाद्याचा जीव वाचविण्यासाठी रक्त हा घटक किती महत्वाचा आहे याची सर्वांना जाणीव आहे. राज्यात सुमारे ३४ ब्लड बँक कार्यरत आहेत. त्यामध्ये काही दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध आहे. कोरोनामुळे महाविद्यालये बंद आहेत. खासगी कंपन्यांचे वर्क फ्रॉम होम सुरू आहे आणि सोशल डिस्टंन्सिंगच्या मर्यादेमुळे रक्तदान शिबीरे आयोजित करण्यावर मर्यादा येत आहेत. या साऱ्यांमुळे रक्तदान कमी होत आहे. एरवी महाराष्ट्र देशात रक्त संकलानात अग्रेसर आहे. मात्र आता कोरोनामुळे रक्त टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रक्तदान करणे हाच एक पर्याय असल्याचे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले.

रक्त तयार करता येत नाही आणि संकलन केलेले रक्त दीर्घकाळ साठवता येत नाही. त्यामुळे सातत्याने रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे आवश्यक आहे. ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त १३ ते २० डिसेंबर दरम्यान स्वाभिमान सप्ताह साजरा केला जाणार असून त्यानिमित्त प्रत्येक तालुक्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी आपल्या वाढदिवशी, लग्नाच्या वाढदिवशी अशा विविध प्रसंगाचे औचित्य साधून वर्षातून दोन वेळेस रक्तदान करण्याचे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले.

हेही वाचा -11 हजार 764 अल्पसंख्याक उमेदवारांना मिळणार कौशल्य विकास प्रशिक्षण

हेही वाचा -मुंबईत नाईट क्लब, पब, हॉटेल, रेस्टॉरंट महापालिकेच्या रडारवर

ABOUT THE AUTHOR

...view details