मुंबई : बृहन्मुंबई महापालिकेने नागरी तंत्रज्ञानावर आधारित सोसायटी फॉर मुंबई इनक्यूबेशन लॅब टू एंटरप्रेन्योरशिप कौन्सिल बिझनेस इनक्युबेशन सेंटर ही सुविधा सुरू केली आहे. या सेंटरचा उद्देश हे नाविन्यपूर्ण वस्तू, उपकरण व तंत्रज्ञान याबाबत असलेल्या नवउद्यमी यांना मदत करून नागरी पायाभूत सुविधा अधिक मजबूत करणे, हा आहे. स्माईल कौन्सिल ही संस्था नाविन्यपूर्ण स्टार्टअपद्वारे तयार केलेल्या वस्तू, उपकरण व तंत्रज्ञान यांची संबंधित विभागाच्या सहकार्याने महापालिकेमध्ये प्रायोगिक तत्वावर उपयोगात आणण्याची संधी प्रदान करते. स्माईल कौन्सिल्सच्या पहिल्या तुकडीमध्ये बायोनिक होप प्रायव्हेट लिमिटेड या स्टार्टअपचा समावेश आहे.
रूग्णास प्रगत कृत्रिम हात : बायोनिक होप प्रायव्हेट लिमिटेड या स्टार्टअपने प्रगत कृत्रिम हात तयार केलेला आहे. जो इतर पर्यायांच्या तुलनेत अधिक नैसर्गिक आणि मुक्त हालचाल करण्यास मदत होते. हा कृत्रिम हात स्माईल कौन्सिलने प्रायोगिक चाचणीकरिता महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये नोंदवलेल्या गरजूना उपलब्ध करुन दिलेला होता. राष्ट्रीय स्टार्टअप दिवसाचे औचित्य साधून प्रायोगिक तत्वावर नायर रुग्णालयातील ऑर्थोपेडिक विभागातील रूग्णास हा प्रगत कृत्रिम हात बसवण्यात आला. या उपक्रमाचे नोडल अधिकारी म्हणून ऑर्थोपेडिक्स विभागाचे प्रोफेसर डॉ. कुमार डूसा हे कामकाज पाहत होते. या कार्यक्रमास संचालक तथा नायर रूग्णालय व दंत महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे, प्रमुख व्यवसाय विकास शशी बाला, ऑर्थोपेडिक्स विभाग प्रमुख डॉ. आर. सी. एस. खंडेलवाल व इतर मान्यवरांची उपस्थिती होती.