मुंबई -नवी मुंबई मधील विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचे नाव दिले जावे म्हणून मोर्चा काढण्यात आला आहे. आज (गुरुवार) निघालेल्या मोर्चामध्ये मनसे नेते आणि पक्षाचे एकमेव आमदार राजू पाटील सहभागी झाले आहेत. तर या अगोदर मनसे नेते राज ठाकरे यांनी नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव दिले जावे असे म्हटले होते. याबद्दल आमदार पाटील यांना विचारले असता, मोर्चाची ताकद वाढवण्यासाठी आपण या मोर्चात सहभागी झाल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.
राज ठाकरे यांनी तांत्रिक बाजू मांडली होती - राजू पाटील
नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव दिले जावे, या मागणीने प्रकल्पग्रस्तांनी काढलेल्या मोर्चात मनसे नेते राजू पाटील सहभागी झाले. त्यामुळे एकंदरीत राज ठाकरे यांच्या भूमिकेवर राजू पाटील ठाम नसल्याचे म्हटले जात आहे. मात्र यावर उत्तर देताना राजू पाटील यांनी म्हटले आहे की, मनसे नेते राज ठाकरे यांनी तांत्रिक गोष्ट समजावून सांगत असताना सांगितले होते की, नवी मुंबईतील विमानतळाचा कोड जर बदलला जाणार नसेल तर त्याचे नाव छत्रपती शिवाजी महाराज असेच राहील. याचे कारण, भारतात असलेल्या विमानतळांना त्यांचे सांकेतिक कोड दिलेले असतात. मुंबई विमानतळाचा सांकेतिक कोड हा BOM असून जर नवी मुंबई विमानतळाचा कोड तोच राहणार असेल तर त्याचे नाव बदलले जाणार नाही, असे आमदार राजू पाटील यांनी म्हटले आहे. मात्र जर कोड बदलला जात असेल तर त्याचे नावही बदलले जाईल असे म्हणत आपण मनसे तर्फे या मोर्चाला पाठिंबा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.