मुंबई -वांद्रे येथील बहरामबाग परिसरातील एक चार मजली इमारतीचा काही भाग कोसळला आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाले आहेत.
रज्जाक चाळच्या एका इमारतीच्या काही भाग अचानक कोसळल्याची ही दुर्घटना रविवारी मध्यरात्रीनंतर जवळपास दीड ते दोन वाजेच्या सुमारास घडली. यानंतर स्थानिक आमदार झिशान सिद्दीकी यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी अग्निशमन दल तसेच पोलीस पथक दाखल झाले आहे. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मलब्याखाली आणखी काही लोक अडकल्याची भीती असल्यानं काही स्थानिकांच्या मदतीनं मलबा बाजूला काढण्याचं काम अग्निशामक दलाचे जवान करत आहेत. आमदार सिद्दीकी यांनी सांगितले, मुंबई महापालिकेला मागील तीन तासांपासून याठिकाणी कामगार पाठवण्याची विनंती केली आहे. मात्र, आतापर्यंत घटनास्थळी केवळ दोन कामगार दाखल झाले आहेत. स्थानिकांच्या मदतीने सध्या याठिकाणी काम सुरू आहे.