मुंबई - एल्फिन्स्टन रोड दुर्घटनेनंतर वेगाने विकसित करण्यात आलेल्या परळ टर्मिनसचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ३ मार्चला या टर्मिनसचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे. नव्या परळ टर्मिनसमधून १६ अप आणि १६ डाऊन, अशा एकूण ३२ परळ लोकल सोडण्याची योजना आहे. ही योजना रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आली आहे. परळ लोकलमुळे दादरच्या गर्दीचा भार कमी होणार असून, रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
मध्य रेल्वेच्या परळ स्थानक परिसरात गिरण्यांच्या जागेवर उभ्या राहिलेल्या टॉवर तसेच कॉर्पोरेट ऑफिसेसमुळे येथे मोठ्या संख्येने प्रवासी वर्दळ असते. या स्थानकाच्या आजूबाजूला कॅन्सरवर उपचार देणारे देशातील सर्वात मोठे टाटा रुग्णालय, केईएम, वाडिया प्रसूतिगृह रुग्णालय यांसारख्या महत्त्वाच्या रुग्णालयांत येणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची संख्याही लक्षणीय आहे. एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाच्या दुर्घटनेनंतर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी स्वतः लक्ष घालून कर्मचाऱ्यांना परळ टर्मिनसचे काम युद्धपातळीवर करण्याचे आदेश दिले. त्यामुळे साधारणपणे एका वर्षातच आधुनिक सोयीसुविधा असलेले परळ टर्मिनस बांधून पूर्णत्वास आले.