मुंबई -मी राष्ट्रीय स्तरावर काम करते, माझे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा हे आहेत, असे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी आपल्या नाराज समर्थकांची मनधरणी करताना केले. पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. भारतीय जनता पक्षातील राज्यातील नेतृत्व पंकजा मुंडे यांना डावलण्याचा प्रयत्न करण्यात येतोय का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. एक प्रकारे पंकजा मुंडे यांनी राज्याच्या नेतृत्वाबद्दल बंड पुकारल्या सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शिस्तप्रिय भारतीय जनता पक्ष पंकजा मुंडे यांच्यावर कारवाई होणार का, अशीही चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे.
देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेण्याचे टाळले
आपण राष्ट्रीय स्तरावर काम करत आहे. त्यामुळे आपले नेते हे राष्ट्रीय स्तरावरचे नेते आहेत असे सांगत असताना पंकजा मुंडे यांनी कटाक्षाने राज्यातील नेतृत्व असलेले देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेणे टाळले आहे. मात्र, नाराज समर्थकांचे राजीनामे आणि त्या नाराज समर्थकांची पंकजा मुंडे यांनी काढलेली समजूत ही भारतीय जनता पक्षावर पंकजा मुंडे यांच्याकडून करण्यात आलेले दबावतंत्र असल्याचे मत राजकीय विश्लेषक अजय वैद्य यांनी मांडला आहे. सध्या राज्यातील भारतीय जनता पक्षाची एक हाती सूत्र ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत. पंकजा मुंडे यांनी असाच आक्रमक पवित्रा ठेवला तर, येणाऱ्या काळात भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतील ज्येष्ठ नेत्यांना देवेंद्र फडणवीस यांना नमत घेण्याच्या सूचना करण्याची शक्यता असण्याचे मत अजय वैद्य यांनी व्यक्त केले.
योग्य वेळी घेणार निर्णय
राज्याच्या राजकारणात पंकजा मुंडे यांना रस आहे. मात्र, सध्या राज्याच्या राजकारणात त्या सक्रिय नसल्याचे चित्र आहे. नुकतेच ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर पंकजा मुंडे यांना राज्याच्या राजकारणात सक्रिय होण्याची संधी मिळाली. पण, आपल्या भाषणातून पंकजा मुंडे यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ, असे सूचक वक्तव्य केले आहे.