मुंबई -चित्रकार हनीफ शेखला ( वय 33 ) मालवणी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 200 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. मालवणी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर भालेराव यांनी 60 हजार रुपयांच्या नोटा जप्त केल्याची माहिती दिली. जप्त केलेल्या नोटा तपासासाठी पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
मालवणी पोलिसांची कारवाई - छपाई मशिनच्या साहाय्याने भारतीय बनावट नोटा वितरीत करणाऱ्या हनिफला मालवणी पोलिसांनी अटक केली आहे. यासंदर्भात मालवणी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम - ४८९ (अ), ४८९ (ब), ४८९ (क), ४८९ (ड), १२० (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेला आरोपी हनिफ शेख हा पालघर जिल्ह्यातील नायगाव येथील चिंचोटी परिसरातील करमल पाडा येथे राहतो. या प्रकरणात आणखी आरोपी असण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने मालवणी पोलीस तपास करत आहेत.
गुप्त बातमीद्वारे बनावट नोटांची माहिती -५ जानेवारी रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक हसन मुलाणी, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशंकर भोसले यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश साळुंके यांचे पोलीस पथक मालवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मालवणी अंबुजवाडी परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना गुप्त बातमीद्वारे बनावट नोटांची माहिती मिळाली होती.