महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत पालिका रुग्णालयांसह कोरोना केंद्रात ऑक्सिजन पुरवठ्याचे काम युद्धपातळीवर सुरू - मुंबई कोरोना रुग्णालय

पालिकेची रुग्णालये आणि कोरोना केंद्रात ऑक्सिजन यंत्रणा उभारण्यासाठी १३ हजार किलोलीटर व ६ हजार किलोलीटर अशा दोन प्रकारातील अवाढव्य ऑक्सिजनच्या टाक्या विविध १४ ठिकाणी लावण्याचे निश्चित करण्यात आले, तर इतर ६ रुग्णालयांमध्ये १ हजार लीटर क्षमतेच्या टाक्या लावण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. त्यामुळे ऑक्सिजन पुरवठ्यासह बेडची संख्या आणखी वाढून रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

Oxygen supply in BMC hospitals
पालिका रुग्णालये, कोरोना केंद्रात ऑक्सिजन पुरवठा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

By

Published : Jun 18, 2020, 7:36 PM IST

मुंबई - शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची आवश्यकता आहे. त्यामुळे पालिका रुग्णालये व कोरोना उपचार केंद्र अशा २० ठिकाणी २ लाख ८ हजार लीटर ऑक्सिजन पुरवठ्याची क्षमता निर्माण करण्याचे काम आता पूर्णत्वाकडे आले असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

पालिका रुग्णालये, कोरोना केंद्रात ऑक्सिजन पुरवठा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली असताना त्यांच्यासाठी बेडची संख्यादेखील वाढवण्यात आली आहे. यामध्ये विशेषत: ऑक्सिजन पुरवठ्याची सोय असलेल्या बेडचा समावेश करण्यात आला आहे. इतर आजारांच्या रुग्णांना आवश्यक असलेला ऑक्सिजन पुरवठा कायम ठेवून कोरोनाबाधित रुग्णांना सातत्याने ऑक्सिजन पुरवावे लागते. त्यामुळे ऑक्सिजन पुरवठ्याची अधिक गरज भासू लागली. ही बाब लक्षात घेऊन महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, सहआयुक्त (अभियांत्रिकी) राजीव कुकनूर यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका प्रशासनाने मोठी रुग्णालये व भव्य कोरोना उपचार केंद्र (जम्बो फॅसिलिटी) अशा एकूण १४ ठिकाणी ऑक्सिजन पुरवठा करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू केली आहे. ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचे काम आता टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे. त्यासोबत ६ रुग्णालयांमध्ये देखील गरजेनुसार ऑक्सिजन यंत्रणा उभारण्यात आली आहे. पालिकेची रुग्णालये आणि कोरोना केंद्रात ऑक्सिजन यंत्रणा उभारण्यासाठी १३ हजार किलोलीटर व ६ हजार किलोलीटर अशा दोन प्रकारातील अवाढव्य ऑक्सिजनच्या टाक्या विविध १४ ठिकाणी लावण्याचे निश्चित करण्यात आले. तर इतर ६ रुग्णालयांमध्ये १ हजार लीटर क्षमतेच्या टाक्या लावण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. त्यामुळे ऑक्सिजन पुरवठ्यासह बेडची संख्या आणखी वाढून रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

ऑक्सिजन पुरवठा होणारी ८ कोरोना उपचार केंद्र -
वरळी एनएससीआय डोम १३ हजार लीटर (१ टाकी ), महालक्ष्मी रेसकोर्स १३ हजार लीटर (१ टाकी ), दहिसर टोल नाका १३ हजार लीटर (१ टाकी ), दहिसर बस आगार १३ हजार लीटर (१ टाकी), मुलूंड येथील रिचर्डसन क्रूडास १३ हजार लीटर (२ टाक्या ), गोरेगाव नेस्को १३ हजार लीटर (२ टाक्या ), वांद्रे –कुर्ला संकुल (भाग १ ) १३ हजार लीटर (१ टाकी ), वांद्रे-कुर्ला संकुल (भाग २) १३ हजार लीटर (१ टाकी).

ऑक्सिजन पुरवठा होणारी विविध ६ रुग्णालये -

शीव (सायन) येथील महानगरपालिका रुग्णालय ६ हजार लीटर (१ टाकी), कस्तुरबा रुग्णालय ६ हजार लीटर (१ टाकी), नायर रुग्णालय १३ हजार लीटर (१ टाकी) आणि ६ हजार लीटर (१ टाकी ), केईएम रुग्णालय १३ हजार लीटर (१ टाकी), घाटकोपरचे राजावाडी रुग्णालय ६ हजार लीटर (१ टाकी), कांदिवली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महानगरपालिका रुग्णालय ६ हजार लीटर (१ टाकी).

ऑक्सिजन पुरवठा होणारी इतर ६ रुग्णालये -
भगवती रुग्णालय १ हजार लीटर (२ टाक्या), कुष्ठरोग उपचार रुग्णालय १ हजार लीटर (१ टाकी), धारावी नागरी आरोग्य केंद्र १ हजार लीटर (२ टाक्या), गोवंडी येथील शताब्दी रुग्णालय १ हजार लीटर (१ टाकी), कुर्ला भाभा रुग्णालय १ हजार लीटर (२ टाक्या), कामाठीपुरा नेत्र रुग्णालय १ हजार लीटर (१ टाकी).

१०० ड्युरा ऑक्सिजन सिलेंडर्स -

मुंबई महापालिकेच्या हद्दीत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. कोरोनाच्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज असल्याने पालिकेने रुग्णालये आणि कोरोना केंद्र अशा २० ठिकाणी ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी टाक्या लावण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. तरीही जोगेश्वरी ट्रॉमा रुग्णालय, बोरिवलीचे भगवती रुग्णालय, गोवंडीचे शताब्दी रुग्णालय, वांद्रे येथील भाभा रुग्णालय, गोरेगाव स्थित नेस्को कोरोना उपचार केंद्र याठिकाणी मिळून १०० ड्युरा ऑक्सिजन सिलेंडर्सदेखील पुरवण्यात येत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details