महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कुणी ऑक्सिजन देता का ऑक्सिजन..! मागणी वाढल्यानं पुरवठा वाढवण्यासाठी 'एफडीए'ने कसली कंबर

राज्यात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने गंभीर रुग्णांची संख्याही वाढत आहे. परिणामी ऑक्सिजनच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या मागणीचा योग्य पुरवठा करण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.

ऑक्सिजन
ऑक्सिजन

By

Published : Sep 11, 2020, 7:44 PM IST

मुंबई - राज्यात कोरोना रुग्णांचा रोजचा आकडा आता 20 ते 23 हजाराच्या घरात जात आहे. त्याबरोबरीने गंभीर, ऑक्सिजनची गरज असणाऱ्या रुग्णांची संख्या मागील चार-पाच दिवसात प्रचंड वाढली आहे. त्यामुळेच आजच्या घडीला 870 टन ऑक्सिजनची गरज निर्माण झाली आहे. रुग्णांचा आकडा आणखी वाढण्याची भीती लक्षात घेता ऑक्सिजनच्या मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. ही गरज योग्य प्रकारे पूर्ण करण्यासाठी आता अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) कामाला लागले आहे. त्यानुसार स्वतःच्या उद्योगासाठी ऑक्सिजन तयार करणाऱ्या मॅन्युफॅक्चरचा शोध घेण्यात येत असून त्यांना वैद्यकीय वापरासाठी ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी तयार केले जात आहे. तर या मॅन्युफॅक्चरला एका दिवसात परवाना देण्यात येत आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा संपूर्ण राज्यात सुरळीतपणे होईल, असा दावा एफडीए आयुक्त अरुण उन्हाळे यांनी केला आहे.

माहिती देतना अन्न आणि औषध प्रशासन अधिकारी
कोरोना आजार हा मूळ श्वसनाचा आजार आहे. त्यामुळे साहजिकच गंभीर रुग्णांना ऑक्सिजनची गरज पडते. मार्चपासून मुंबईसह पुण्यात गंभीर रुग्ण आढळत असून त्यांना ऑक्सिजनची गरज लागत आहे. जून-जुलैमध्ये तर कोरोनाचा कहर राज्यभर पसरला. तर आता ग्रामीण भागातही कोरोना वाढत आहे. त्यात आता 23 हजाराहून अधिक रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे गंभीर रुग्णही वाढत आहेत. आज राज्यात 11 हजाराहून अधिक रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. त्यामुळेच मार्चमध्ये जिथे अंदाजे 300 टन ऑक्सिजन वैद्यकीय वापरासाठी लागत होते तिथे जुलैमध्ये 400 ते 450 टनवर ही मागणी गेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे सप्टेंबरमध्ये ही मागणी थेट 870 टनावर गेली आहे.

एफडीएचे सहआयुक्त जुगलकिशोर मंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील तीन दिवसातच 800 टनावरून मागणी 870 टनावर गेली आहे. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार अनलॉकमुळे रुग्ण वाढण्याची आणि पर्यायाने ऑक्सिजनचीही गरज वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी एफडीएने कंबर कसली आहे. त्यानुसार एफडीएमध्ये एक विशेष नियंत्रण कक्ष स्थापण्यात आला आहे. या कक्षाद्वारे ऑक्सिजनची गरज असेल तिथे त्वरित टँकर, सिलेंडर पोहचवणे, ऑक्सिजनच्या वाहतुकीत येणारे अडथळे दूर करणे, अशी कित्येक कामे मार्गी लावली जाणार आहेत.

हेही वाचा -सरकारच्या निष्क्रियतेमुळे खासगी लॅबधारकांनी जनतेची केली २७० कोटींची लूट - प्रविण दरेकर

दरम्यान, आज राज्यातील मॅन्युफॅक्चर आणि आरोग्य विभागाची ऑनलाइन बैठक एफडीएने घेत वैद्यकीय वापरासाठीच्या ऑक्सिजनची क्षमता वाढवावी. सरकार नव्या नियमानुसार वैद्यकीय वापरासाठी 80 टक्के तर औद्योगिक वापरासाठी 20 टक्केच ऑक्सिजन पुरवठा करावा, असे आवाहन करण्यात आल्याचे उन्हाळे यांनी सांगितले आहे. त्याचवेळी राज्यात ऑक्सिजनची मागणी वाढली असली तरी त्याचा तुटवडा सध्या नाही. आपल्याकडे पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा आहे. राज्यात 24 मॅन्युफॅक्चर आणि 65 रिफिलर्स यांच्या माध्यमातून 1210 टन दिवसाला ऑक्सिजनची निर्मिती केली जाते. तर नव्या 80 टक्क्यांच्या नियमानुसार वैद्यकीय वापरासाठी 1050 टन ऑक्सिजन दिवसाला उपलब्ध होत आहे. त्यामुळे ऑक्सिजनची कमतरता नाही. ऑक्सिजन मिळत नसल्याच्या ज्या तक्रारी आहेत, त्या ऑक्सिजनच्या वाहतुकीत अडथळे येत असल्याने, ऑक्सिजनचे टँकर वेळेत पोहचत नसल्याने ऑक्सिजन उपलब्ध होताना दिसत नाही. पण, आता या अडचणीही आम्ही दूर केल्या आहेत. ऑक्सिजनचे टँकर कुठेही वाहतूक विभागाकडून अडवले जाऊ नयेत, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. त्याचवेळी ऑक्सिजनच्या निर्मितीत खंड येऊ नये, यासाठी कोणत्याही परिस्थितीत मॅन्युफॅक्चरचा वीज पुरवठा खंडित करू नये, असेही आदेश महावितरणला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.

एका दिवसात 3 नवे मॅन्युफॅक्चरर शोधले

ऑक्सिजनची क्षमता-निर्मिती वाढवण्यासाठी आता एफडीएने नवीनही मार्ग अवलंबले आहेत. त्यानुसार नवीन, जे केवळ स्वतःच्या उद्योगासाठी ऑक्सिजन तयार करतात, त्यांनाही वैद्यकीय वापरासाठी ऑक्सिजन निर्मिती करण्यासाठी तयार केले जात आहे. एफडीएच्या या प्रयत्नाना यश आले आहे. एका दिवसात 3 नवे मॅन्युफॅक्चर शोधून त्यांना परवाना देण्यात आला आहे. यात दोन पुणे मंडळातील तर एक कोकणातील मॅन्युफॅक्चर आहे. कोकणातील एका मॅन्युफॅक्चरच्या माध्यमातून आता दिवसाला 80 टन ऑक्सिजन वाढणार आहे. तर आणखी मॅन्युफॅक्चररचा शोध घेत ऑक्सिजनची निर्मिती मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात येणार असल्याचेही उन्हाळे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा -कोरोना रुग्णांसाठी नागपुरात 'मिशन विश्वास', राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उपक्रम

ABOUT THE AUTHOR

...view details