मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रसार गेले वर्षभर आहे. यावर्षी फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट आली होती. आता पुन्हा तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने त्याचा सामना करण्यासाठी मुंबईत चार नवीन जंबो सेंटर उभारली जात आहेत. त्यात ५५०० बेड असणार असून त्यातील ७० टक्के बेड ऑक्सिजनचे तर १ हजार आयसीयू बेड असणार आहे. यामुळे सध्या असलेल्या बेडच्या संख्येत वाढ होणार असल्याने रुग्णांची संख्या वाढली तरी त्यांच्यावर उपचार करणे शक्य होणार आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.
चार नवीन कोविड सेंटर -
मुंबईत गेल्यावर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून मुंबईत कोरोनाचा प्रसार सुरू झाला. यावर्षी जानेवारीत हा प्रसार कमी झाला. मात्र पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आल्याने रुग्णसंख्या वाढू लागली. ऑक्सिजन आणि ऑक्सिजन बेड्सची कमतरता भासू लागली. त्यासाठी पालिकेने उपाययोजना केल्याने आता दुसरी लाटही आटोक्यात आली. मात्र मुंबईत पुन्हा तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवल्याने पालिकेने ही लाट थोपवण्यासाठी आणि त्याचा सामना करण्यासाठी ऑक्सिजन बेड आणि आयसीयू वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पालिका कांजूरमार्ग, मालाड, महालक्ष्मी व भायखळा या चार ठिकाणी जंबो कोविड सेंटर उभारणार आहे. या कोविड सेंटरमध्ये ५५०० बेड्स असणार आहे.
ऑक्सिजन बॅकअप -
दुसऱ्या लाटेत रुग्णांना ऑक्सिजन आणि आयसीयू बेडची कमतरता भासली होती. याचा अनुभव घेत महापालिकेने या चारही कोविड सेंटरमधील ५५०० बेड्स पैकी ७० टक्के म्हणजेच सुमारे ३८०० बेड्स हे ऑक्सिजनचे तर १ हजार आयसीयू बेड्स म्हणून उपलब्ध केले जाणार असल्याची माहिती काकाणी यांनी दिली आहे.
पॉवर, ऑक्सिजन बॅकअप -
कोरोना रुग्णांवर आयसीयूत आणि ऑक्सिजनद्वारे उपचार केले जातात. यासाठी वीज महत्त्वाची आहे. वीज नसल्यास यंत्रे बंद पडून रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो. यासाठी पालिकेने सहा जंबो कोविड सेंटरमध्ये युपीएस सिस्टिम कार्यान्वित केली आहे. पॉवर बॅकअप घेतल्याने वीज नसली तरी यंत्रे सुरू राहणार आहेत. तसेच ऑक्सिजनचा बॅकअप असावा म्हणून जंबो सिलिंडर व टरबो सिलिंडर, डिझेलची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती सुरेश काकाणी यांनी दिली आहे.