ऑक्सफर्डच्या लसीची मानवी चाचणी मुंबईच्या नायर रुग्णालयात होणार - कोरोनावरील लस अपडेट
ऑक्सफर्डच्या कोरोनाच्या लसीवरील मानवी चाचणीसाठी मुंबई महानगर पालिकेच्या नायर आणि केईएम रुग्णालयाची निवड झाली आहे. याची सप्टेंबरमध्ये प्रत्यक्ष चाचणीला सुरुवात होणार आहे.
मुंबई - ऑक्सफर्डच्या कोरोनाच्या लसीवरील मानवी चाचणीसाठी मुंबई महानगर पालिकेच्या नायर आणि केईएम रुग्णालयाची निवड झाली आहे. त्यानुसार नायर रुग्णालयाने यासाठीची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार सर्व प्रक्रिया पूर्ण करत सप्टेंबरमध्ये प्रत्यक्ष चाचणीला सुरुवात होणार आहे. दरम्यान लक्षणीय बाब म्हणजे चाचणीसाठी स्वयंसेवक म्हणून मुंबईकर पुढे येताना दिसत आहेत. नायर रुग्णालयाला रोज बरेच फोन येत असून चाचणीसाठी तयारी दाखवत असल्याची माहिती रुग्णालयातील एका वरिष्ठ डॉक्टरांनी दिली आहे.
‘कोविशिल्ड’ नावाची कोरोना लस तयार करण्यात आली आहे. त्यानुसार भारतातील 10 सेंटरमध्ये मानवी चाचणी होणार आहे. यात नायर आणि केईएम रुग्णालयाचा समावेश आहे. नायर आणि केईएममध्ये 160 जणांवर मानवी चाचणी होणार असल्याचे म्हटले जात होते. पण आता नायरमध्ये 100 तर केईएममध्ये 160 जणांवर मानवी चाचणी होणार आहे. त्यासाठी विशेष वॉर्ड तयार करण्यात येत आहे.
तर स्वयंसेवक शोध मोहीम सुरू आहे. पण स्वतःहूनच अनेक जण यासाठी पुढे येत आहेत. फोन करून आपण तयार असल्याचे सांगत आहेत. पण मानवी चाचणी हे खूप मोठे आव्हान असून आयसीएमआरच्या नियमानुसार ही प्रक्रिया पार पडेल, असेही या डॉक्टरने सांगितले आहे.
25 ते 45 वयोगटातील निरोगी नागरिकांची यासाठी निवड करण्यात येणार होती. तर आता मात्र नायरमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 18 ते 70 वयोगटातील लोकांचाही यासाठी विचार सुरू आहे. यासंबंधीचा निर्णय लवकरच रुग्णालयाच्या इथिक्स समितीत घेतला जाणार आहे. दरम्यान चाचणीसाठी निवडण्यात आलेल्या व्यक्तीची कोरोना आणि अँटिबॉडीज टेस्ट केली जाईल, त्यानंतर इतर सर्व चाचण्या घेत एकदम निरोगी असलेल्या व्यक्तीची त्याच्या संमतीनुसार निवड केली जाणार आहे.
नायरमधील कोरोना योध्येही स्वयंसेवक?
कोरोना लसीच्या मानवी चाचणीसाठी स्वयंसेवक म्हणून पुढे येण्यास सर्व सामान्य मुंबईकर पुढे येत आहेत. तर दुसरीकडे नायर रुग्णालयातील कोरोना योद्धे अर्थात डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय यांचाही विचार होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. मात्र मानवी चाचणीसाठी जे रुग्णांच्या अजिबात संपर्कात येत नाहीत वा आलेले नाहीत, अशांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. पण नायरमधील आरोग्य कर्मचारी उत्सुक आहेत. जे वैद्यकीय दृष्ट्या पूर्णत: तंदुरुस्त आहेत, ज्यांची कोरोना टेस्ट आणि अँटीजन बॉडीज टेस्ट निगेटिव्ह येईल, अशांचीच निवड करण्यात येणार आहे.