मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना येथे खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची लूटमार सुरू आहे. ही लूटमार रोखण्यासाठी पालिकेने ५ आयएएस अधिकाऱ्यांची तसेच पालिकेतील लेखा परिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे आलेल्या तक्रारींवर कारवाई करत २६ रुग्णालयांतील १३४ तक्रारींचा निपटारा करून बिलांमधील एकूण २३ लाख ४२ हजार रुपयांची रक्कम कमी केली आहे. मूळ बिलाच्या १५ टक्के रक्कम कमी होऊन रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
मुंबई महापालिका क्षेत्रातील कोरोनाबाधितांना रुग्णांना वैद्यकीय सेवा सुविधा मिळाव्यात, म्हणून राज्य शासनाच्या निर्देशांनुसार खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा महानगरपालिकेने ताब्यात घेतल्या आहेत. या ८० टक्के खाटांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांकडून, शासनाने २१ मे च्या आदेशान्वये निर्धारित केलेल्या दरानुसार संबंधित रुग्णालयांनी शुल्क आकारणी करणे गरजेचे आहे. असे असले तरी खासगी रुग्णालये रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची लूटमार करत असल्याच्या तक्रारी होऊ लागल्या. यामुळे महानगरपालिका प्रशासनाने, खासगी रुग्णालयांमध्ये सरकारी दरानुसारच शुल्क आकारणी केली जात असल्याची खातरजमा योग्य प्रकारे होणे गरजेचे आहे. यासाठी महापालिकेच्या मुख्य लेखापरीक्षक खात्यातील प्रत्येकी २ अधिकाऱ्यांची नियुक्ती ही खासगी रुग्णालयांसाठी केली आहे. तसेच तक्रार करण्यासाठी आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करत त्यांचे ईमेल आयडी प्रसिद्ध केले आहेत. .