मुंबई - येथे ६ डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी येणार आहेत. मात्र, अरबी समुद्रात आलेल्या २ चक्री वादळांमुळे दादर चैत्यभूमी येथे आलेल्या लाखो भीम अनुयायांना कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालिका प्रशासनाला दिल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. वादळ आणि पाऊस आल्यास त्यासाठी पालिकेने आपला प्लान 'बी' तयार ठेवल्याची माहिती महापौरांनी दिली.
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमी येथे लाखो भीम अनुयायी आले आहेत. दरम्यान अरबी समुद्रात २ चक्रीवादळ येणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. २ वर्षांपूर्वीही आलेल्या ओखी वादळामध्ये शिवाजी पार्कमध्ये उभारण्यात आलेले मंडप कोसळून २ जण जखमी झाले होते. असाच प्रकार पुन्हा घडू नये म्हणून पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने केलेल्या उपाययोजनांचा आढावा मुख्यमंत्र्यानी घेतल्याची माहिती महापौरांनी दिली.