मुंबई -राष्ट्रीय मतदार दिनाच्या या सोहळ्याचा शुभारंभ विद्यार्थ्यांच्या लोकशाही दिंडीने होणार आहे. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम, नवमतदारांना मतदार ओळखपत्र वाटप, मतदान निष्ठेची शपथ ग्रहण, मतदार जागृतीसंबंधी केलेल्या उपक्रमांच्या पुस्तिकेचे प्रकाशन, इत्यादी कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत. तसेच मतदार नोंदणी, मतदार जागृती यासंबंधी उत्कृष्ट कार्य केलेले जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी, सामाजिक संस्था, पत्रकार समाजमाध्यमांवर उत्तम कार्य केलेले निवडणूक कार्यालय यांना पुरस्कार दिले जाणार आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने आयोजित केलेल्या ‘माझा गणेशोत्सव माझा मताधिकार’, ‘लोकगीतांतून लोकशाहीचा जागर’ या राज्यस्तरीय स्पर्धांतील विजेत्यांनाही पुरस्कार दिले जातील.
मतदार जागृती दालन उभारण्यात येणार-मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या विद्यापीठ स्तरीय रांगोळी, भित्तिपत्रक या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात येणार आहेत. राष्ट्रीय मतदार दिनाच्या या कार्यक्रमात विद्यापीठ परिसरात मतदार जागृती दालन उभारण्यात येणार असून सापशिडी, लुडो यांसारख्या खेळांतून विद्यार्थ्यांना मतदान, निवडणूक या संबंधी प्रक्रिया समजावून सांगितली जाईल. अभिरूप मतदान केंद्राचे दालन, निवडणुकीसंबंधी प्रदर्शन, विविध आकर्षक साहित्यांनी सुशोभित लोकशाही भिंत इथे उभारण्यात येणार आहे. तसेच, नागरिकांनी मतदान करणे का आवश्यक आहे, यासंबंधीचे पथनाट्य सादरीकरण करण्यात येणार आहे.