मुंबई :उत्सव, आनंद, दु:ख आले की, व्यसन आलेच. देशात सण उत्सवाच्या निमित्ताने अनेक जण व्यसनाच्या अहारी जातात. त्यामुळे आज नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्यतर्फे व्यसनाची होळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सीएसएमटी रेल्वे स्थानकाबाहेर कॅपिटल थिएटरसमोर दारू, ड्रग्ज, बिडी, तंबाखू, मावा, चरस यांचे दहन करण्यात आले. त्याचप्रमाणे होळी सणापासून व्यसनमुक्तीचा संकल्प करा, मत परिवर्तन, समुपदेशन कायदा मेडिटेशन असे बाण देखील होळीभोवती लावून सजावट करण्यात आली. यावेळी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी होळीभोवती सुंदर रांगोळी रेखाटली होती.
व्यसनमुक्तीचा संदेश : व्यसनांचे दुष्परिणाम दर्शविणारी पोस्टर्स पादचारी लोकांचे लक्ष वेधुन घेत होती. व्यसनमुक्तीच्या फलकांद्वारे व्यसनांचा आयुष्यावर होणारे परिणाम सांगण्यात आले. व्यसनापासुन परावृत्त होऊन आनंदी जीवन कसे जगता येईल असा संदेश कार्यक्रमात देण्यात आला. वाचा विचार करा, निर्व्यसनी महाराष्ट्र निर्माण करण्याच्या संकल्पात सहभागी व्हा या पत्रकांचे वाटप देखील यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात अपुनको नको लिमिट - L लिकर, T टोबँको, D ड्रग्ज या व्यसनमुक्तीवरील धमाकेदार सांस्कृतिक कार्यक्रमाने झाली. या प्रसंगी शाहीर नंदू बनसोडे यांनी गीते, भारुड सादर केली. त्यामुळे उपस्थित जनसमुदायांत जनजागृती करण्यास मदत झाली. आपण करत असलेल्या व्यसनामुळे जखडलेल्या राक्षसाने आपल्या मुसक्या आवळल्याचे चित्रण यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्यातुन दाखविण्यात आले.
व्यसनामुळे तरुणांचे आयुष्य कमी :नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले की, मुंबईसह महाराष्ट्रातील तमाम जनतेला होळीच्या सदिच्छा देते. होलिकेला नमन करूया व्यसनांचे दहन असे या कार्यक्रमाच्या टायटल आहे. उत्सव आला की व्यसन केले जाते. म्हणून उत्सवाच्या दिवशी सुद्धा माणसाला व्यसनापासून दूर राहायचे असेल तर होळी हा दिवस सगळ्यात योग्य आहे. तुम्ही या दिवशी संकल्प करू शकता. आता ज्या पद्धतीने व्यसनांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे सामाजीक प्रश्न जटील होत आहे. व्यसनामुळे तरुणांचे आयुष्य कमी होत आहे.