मुंबई - बृहन्मुंबई परिसरात कोरोनामुळे उद्भवलेल्या आरोग्यविषयक आणीबाणी सदृृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मंगळवारी कामावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीमुळे शिक्षकांना विविध प्रकारची कामे सोपवण्यात येणार आहेत. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षकांना त्यांच्या वार्डमध्ये असलेल्या प्रशासकीय कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई आणि परिसरात अत्यावश्यक सेवा व आरोग्य सेवा यांसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाचा तुटवडा जाणवत आहे. त्यासाठी पालिकेच्या शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक, शिपाई, हमाल आदी कर्मचाऱ्यांना मदतीसाठी घेतले जाणार आहे.
कर्मचाऱ्यांना मिळालेला आदेश या आदेशाचे पालन न केल्यास साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा, १८९७ आणि भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ नुसार कारवाई केली जाईल असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. उपस्थित राहणाऱ्या सर्व शिक्षकांचे उपस्थिती अहवालही सादर केले जाणार आहेत. याबाबत महापालिकेच्या सर्व माध्यमाच्या शाळांतील मुख्याध्यापकांसोबत सोमवारी शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी झूम अॅपद्वारे बैठक घेतली. गावी गेलेले शिक्षक, शिक्षणसेवक व शिक्षकेतर कर्मचाऱयांनी दोन दिवसांत उपस्थित राहणे अपेक्षित आहे.
दरम्यान, जिल्हाबंदी असल्याने तसेच वाहतुकीची व्यवस्था नसल्याने कर्मचाऱ्यांनी शाळांमध्ये कसे उपस्थित रहावे? रेड झोनमध्ये असलेल्या कर्मचाऱयांच्या आरोग्याचे काय? तसेच अनेक शिक्षक मूळ गावी गेल्याने ते दोन दिवसात कसे उपस्थित राहतील? याचा मुंबई प्रशासनाने विचार करावा. कारवाई करण्याचे पत्र मागे घ्यावे, अशी मागणी कर्मचाऱयांमधून येत आहे.