मुंबई :मुंबईमध्ये वाढती वाहने, अरुंद रस्ते, कशाही पद्धतीने केली जाणारी पार्किंग, जागोजागी असलेले सिग्नल, धोकादायक पूल, यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक (order to break traffic jam in Mumbai) कोंडी होते. मुंबईमध्ये ३१४ हुन अधिक पूल बांधण्यात आले आहेत. त्यापैकी २९ पूल अतिधोकादायक असल्याचे समोर आले आहे. हे धोकादायक पूल पाडून त्याठिकाणी नवे पूल बांधण्यास पालिकेने (Municipal Corporation) सुरुवात केली आहे. तर १८४ पुलांची डागडुजी केली जात आहे. मुंबईमध्ये १२ पूल केबल आधारित बांधले जाणार आहेत. लेझर लाईट आणि सौंदर्यीकरण यामुळे पुलांचे सौंदर्यात भर पडणार आहे. पूल नवे बांधल्याने (Many Bridges Construction Started) मुंबईकरांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
मुंबईतील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट :अंधेरी येथील गोखले पूल २०१८ मध्ये तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पूल २०१९ मध्ये पडला होता. या दुर्घटनांनंतर मुंबईतील धोकादायक पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला. मुंबईत एकूण ३१४ पूल असून, बहुतांशी पूल जुने ब्रिटीशकालीन असल्याने यातील २९६ पुलांचे स्ट्रक्टरल ऑडिट करण्यात आले. यामध्ये मुंबई शहर विभागात ८१, पूर्व उपनगरात ९० आणि पश्चिम उपनगरात १४३ पूल आहेत. यात एमएमआरडीएने २३ स्कायवॉक पालिकेकडे हस्तांतरित केले आहेत. ऑडिटमध्ये ३१४ पैकी २९ पूल अतिधोकादायक असल्याचा अहवाल देण्यात आला. तर १८४ पुलांची छोटी - मोठी दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे अहवालात सूचवण्यात आले. स्ट्रक्चरल ऑडिटच्या अहवालानुसार पुलांची दुरुस्ती आणि पुनर्बांधणीचे काम सध्या सुरु असल्याचे पालिकेच्या पायाभूत सुविधा विभागाचे उपायुक्त उल्हास महाले यांनी सांगितले.
गोखले पुलाचे काम सुरु :अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या येथील गोखले पुलाचे काम पालिकेने हाती घेतले आहे. या पुलाचे काम करताना पालिकेच्या अखत्यारीतील टप्प्याचे २६५ मीटरचे काम हे पहिल्या टप्प्यात अपेक्षित होते. तर दुसऱ्या टप्प्यातील कामामध्ये रेल्वेच्या अखत्यारीतील आणि दुसऱ्या लेनचे काम होणार होते. या दोन्ही कामासाठी साधारणपणे चार वर्षांचा कालावधी अपेक्षित होता. परंतु पुलाच्या तपासणीसाठी नेमण्यात आलेल्या एससीजी कन्सलटन्टने दिलेल्या अहवालाने या कामाला वेग आला आहे. सल्लागाराने चार वर्षाचे काम दोन वर्षात करण्याचा सल्ला दिल्याने आता दोन्ही टप्प्यातील काम एकत्रितपणे केले जाणार आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी १६१ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. पुल तातडीने पाडण्याचे काम पालिकेकडून हाती घेण्यात येणार आहे. येत्या सहा महिन्यांमध्ये अंधेरीच्या गोखले पुलावर एका लेनवरून वाहतूक सुरू करण्यात येईल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनी दिली.
हिमालय पूल ६ महिन्यात तयार :मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पूल १४ मार्च २०१९ मध्ये कोसळून सात जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गेल्या तीन वर्षात या पुलाचे बांधकाम पूर्ण झालेले नाही. यामुळे रेल्वे प्रवासी आणि येथील स्थानिकांना रस्ता ओलांडून प्रवास करावा लागत आहे. मात्र आता पुढील सहा महिन्यात हा पूल प्रवाशांच्या सेवेत असेल. लोखंडी पुलाला पावसाळ्यात गंज पकडतो. यासाठी आता हिमालय पूल स्टेनलेस स्टीलचा बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सीएसएमटी स्थानकातून १ नंबर प्लॅटफॉर्मवरून ठाणे बाजूने बाहेर आल्यावर, आझाद मैदान पोलीस ठाण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर सरकते जिने बसवण्यात येणार आहेत. याचा उपयोग जेष्ठ नागरिकांसह गरोदर महिलांना होईल. पुलाच्या पिलर उभारण्याचे काम सुरु आहे. त्यानंतर स्टेनलेसस्टिलचा गर्डर बनवला जाणार आहे. हा गर्डर आणून पिलरवर ठेवला जाणार आहे अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली.