मुंबई- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नागरिकांच्या समस्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निदर्शणास आणून देण्यासाठी विरोधी पक्ष नेते देवेद्र फडणवीस यांनी त्यांना पत्र लिहिले आहे. पत्रात रेशन, धान्य वितरण, आरोग्य व्यवस्था या सारख्या विषयांवर फडणवीस यांनी प्रकाश टाकला आहे.
राज्यातील नागरिकांना रेशनचे धान्य प्राप्त होत नसल्याच्या तक्रारी वारंवार येत आहेत. वस्तुतः केंद्र सरकारने ३ महिन्यांचे धान्य रेशनमार्फत मोफत देण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. त्यापैकी ९० टक्के कोटा राज्याला प्राप्त झाला आहे. तरी सुद्धा त्याच्या वितरणाची व्यवस्था खोळंबली आहे, त्यामुळे यात आपण स्वतः लक्ष घालावे अशी माझी नम्र विनंती आहे. त्याचबरोबर, सुमारे १६ राज्यांनी रेशनकार्ड नसलेल्या नागरिकांनासुद्धा धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात सुद्धा असा निर्णय घेणे सहज शक्य आहे. अतिरिक्त लागणारे धान्य केंद्र सरकार अत्यल्प दरात उपलब्ध करून देत असले, तरी वाटपातील साठा शिल्लक रहात असल्याने त्याची गरज पडणार नाही. त्यामुळे, केंद्र सरकारने कोटा उपलब्ध करून दिल्याप्रमाणे प्रत्येकाला ३ महिन्याचे धान्य त्वरित उपलब्ध करून द्यावे, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.
तसेच, ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही, त्याचे आधारकार्ड प्रमाण मानून त्याना धान्य उपलब्ध करून द्यावे. तसेच ज्यांच्याकडे दोन्ही नाही, अशांची यादी तयार करून ती प्रमाणित करून त्यांनाही धान्य सहज उपलब्ध करून देता येईल. ही कार्यवाही आपण स्वतः लक्ष घालून त्वरेने कराल ही नम्र विनंती आहे. शहरातील आरोग्य व्यवस्था आणि एकूणच लॉकडाऊनच्या काळातील परिस्थिती याचेही गांभीर्याने चिंतन होणे गरजेचे आहे. रुग्णालयातील स्थिती आणि प्रत्यक्ष रुग्णांवर उपचार करत असलेले डॉक्टर, परिचारिका आणि अन्य आरोग्य कर्मचारी यांच्या सुरक्षिततेसंदर्भात सुरक्षा उपाययोजनांची कमतरता याबाबी मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत. या बाबतही त्वरित उपाय योजना करण्याची नितांत गरज असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.