मुंबई :राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसरा आठवड्यातील शेवटच्या दिवशी विरोधक राज्य सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर तुटून पडले. हातात भोपळा आणि खोके घेऊन सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पाचा निषेध केला. ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांना याबाबत विचारले असता, अर्थमंत्र्यांनी वाचलेले बचत हवेतील अर्थसंकल्प आहे. यातून जवळपास साडेचार कोटींचा महसूल मिळणार आहे. अर्थसंकल्पात तो पावणे सहा कोटी दाखवला आहे. पावणे दोन लाख कोटी सरकार कुठून आणणार? दुसरीकडे उत्पन्नच नसेल तर खर्च कसा आणि कोणत्या स्वरूपात करणार, असा प्रश्न वायकर यांनी उपस्थित केला.
लोकांना केवळ आश्वासने : मुंबई महापालिकेचे बजेट 340 कोटीने तोट्यात होते. स्थायी समितीचे अध्यक्ष असताना त्यावेळी आर्थिक धोरण राबवून नियंत्रण आणून वीस हजार कोटींनी सरप्लस आणले. राज्य सरकारचा अर्थसंकल्प बिरबलची खिचडी आहे. खाली आग लावली आणि उंचावर हंडी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे ती कशी शिजेल आणि खिचडी मिळेल? अशा स्वरूपाचा असल्याचे वायकर म्हणाले. लोकांना केवळ आश्वासने देण्यात आले आहेत.
चुना लावायचे काम :प्रत्येक वस्तूवर नियंत्रण असणे गरजेचे आहे. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प त्यामुळे 88 हजार कोटींनी सरप्लसमध्ये आहे. लोकांची कामे होत आहेत. त्यानुसार राज्य सरकारने काम करायला हवे. चुना लावायचे काम सरकारने केले आहे. राज्य सरकारने केलेल्या घोषणासाठी आता पैसे कुठून उभा करणार? हे देखील लोकांना सांगायला हवे. भाषण वाचायला चांगले आहे. परंतु, आर्थिक पैसा नाही, अशी टीका वायकर यांनी केली. आगामी मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, सर्वोच्च न्यायालयातील निकालानंतर तोंडावर पडू नये, याकरिता केलेला प्रयत्न आहे.