मुंबई - राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन कोरोनाच्या परिस्थितीमुळे पुढे ढकलण्यात आले आहे. आता हे अधिवेशन कोरोनाची परिस्थिती पाहून 3 ऑगस्टला होईल, अशी माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कोकणाला विशेष पॅकेज देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. उद्यापासून २ दिवसांच्या कोकण दौऱ्यावर जात असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 3 ऑगस्टला घेण्यास पाठिंबा - देवेंद्र फडणवीस - पावसाळी अधिवेशन लेटेस्ट न्यूज
राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन कोरोनाच्या परिस्थितीमुळे पुढे ढकलण्यात आले आहे. आता हे अधिवेशन कोरोनाची परिस्थिती पाहून 3 ऑगस्टला होईल, अशी माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
राज्याचे पावसाळी अधिवेशन 22 जूनला घेण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोनाच्या परिस्थितीमुळे आज (बुधवार) विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अर्थमंत्री जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर उपस्थित होते. याबैठकीत सरकारने अधिवेशन 3 ऑगस्टला कोरोनाची परिस्थिती पाहून घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
कोरोनाच्या परिस्थितीत अधिवेशनाबाबत सरकार जो निर्णय घेईल, त्याला आमचा पाठिंबा असेल असेही फडणवीस म्हणाले. कोरोनाच्या परिस्थितीत सोशल डिस्टनसिंगसाठी सरकारने नियम बाजूला ठेवून उपस्थिती बंधनकारक न ठेवता अधिवेशन घेण्याची गरज असल्याचे फडणवीस म्हणाले. वाटल्यास सरकारने एक दिवसाचे अधिवेशन घेऊन पुरवण्या मागण्या मंजूर कराव्यात आम्ही त्याला पाठिंबा देऊ असेही फडणवीस यांनी सांगितले.
कोकण दौरा -
राज्यात चक्रीवादळ आल्याने कोकणात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य सरकार नुकसान भरपाई देण्यासाठी जी मदत देणार आहे ती फारच कमी आहे. यामुळे राज्य सरकारने कोकणासाठी विशेष पॅकेज द्यावे, अशी मागणी फडणवीस यांनी केली. उद्यापासून आपण दोन दिवस कोकणच्या दौऱ्यावर जाणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.