मुंबई- तौक्ते चक्रीवादळानंतर सत्ताधारी आणि विरोधकांचा नुकसानग्रस्त भागाची पाहणी दौऱ्याचा सपाटा सुरू झाला आहे. मात्र दोन दिवस उलटून गेले असले तरी मदतीच्या अपेक्षेत असलेल्या सामान्य नागरिकांना आणि शेतकरी, कोळी बांधवांना अद्याप मदत मिळालेली नाही.
तौक्ते चक्रीवादळाचा फटका मुंबईसह राज्याच्या कोकण किनारपट्टीला बसला आहे. यासोबतच राज्याच्या अजूनही काही जिल्ह्यांत तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झाले आहे. यामध्ये किनारपट्टीवर राहणाऱ्या लोकांचे मोठे नुकसान झाले. तर तिथेच कोळी बांधवांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेय. त्यामुळे राज्य सरकारकडून लवकरात लवकर मदत मिळावी, ही अपेक्षा नुकसान ग्रस्त झालेल्या लोकांकडून व्यक्त केली जात आहे. बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसाना संदर्भात चर्चा झाली असून, मत्स्य व बंदरविकास मंत्री अस्लम शेख आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आज नुकसान ग्रस्त झालेल्या भागांची पाहणी दौरा करणार आहेत.
मत्स्य बंदर विकास मंत्री अस्लम शेख आज पालघर जिल्ह्याचा दौरा करून या जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय करणाऱ्या तसेच किनारपट्टीवर राहणाऱ्या लोकांचे झालेल्या नुकसानाची पाहणी करणार आहेत. तर विजय वडेट्टीवार आज रायगड जिल्ह्याच्या पाहणी दौऱ्यावर आहेत. विजय वडेट्टीवार आज रायगडमधील श्रीवर्धन, म्हसळा या तालुक्यात झालेल्या नुकसानाची पाहणी करतील. तिथेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील उद्या पासून नुकसानग्रस्त भागाची पाहणी दौरा करणार असल्याची माहिती मिळत आहे.
अस्लम शेख दौऱ्यासह मदतनिधीबद्दल माहिती देताना.. तौक्ते चक्रीवादळाचा फटका सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. त्यामुळे सिंधुदुर्गाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्याची झालेल्या नुकसानाची पाहणी सुरू करण्यात आली आहे. तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्यांना आणि स्थानिक प्रशासनाला पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अनेक भागात स्थानिक प्रशासनाकडून आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी सुरू करून त्याचे पंचनामे तयार करण्याचे काम देखील सुरू झाले आहे.
विरोधकांचे पाहणी दौरे सुरू-
तौक्ते चक्रीवादळानंतर विरोधीपक्ष नेत्यांचे पाहणी दौरे कालपासून सुरू झाले आहेत. विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर हे नुकसान झालेल्या ठिकाणाची पाहणी करत आहेत. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात विरोधी पक्ष नेते त्यांची पाहणी दौरा असणार आहे. त्यात त्यांनी रायगड मधील नुकसान झालेल्या काही स्थळांची पाहणी केली. सोबतच रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याशी चर्चा करून नुकसानग्रस्त झालेल्या लोकांना त्वरित मदत मिळावी यासाठी शासनाने त्वरित पावले उचलावीत, असेही यावेळी सांगितले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या गुजरातची पाहणी केली. एक हजार कोटींची मदतही घोषित केली. पण अजून महाराष्ट्रासाठी दिल्ली दरबारी उदासीनता पाहायला मिळतेय. केंद्रीय राज्य सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले हे देखील तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याचा दौरा आज करणार आहेत.
सध्या तौक्ते चक्रीवादळ होऊन दोन दिवस उलटून गेले आहेत. या वादळामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडलेत. मोठ्या प्रमाणात शेतमाल आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. तर किनारपट्टीवर राहणाऱ्या कोळी बांधवांच्या बोटींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडून पाहणी दौरे केले जाणार आहेत. पण अद्याप एकाही नुकसानग्रस्तला मदत मिळाली नाहीये. नुकसानग्रस्तला त्वरित पंचनामे करून निकष बाजूला ठेवून राज्य सरकार नुकसानग्रस्तांना मदत करण्याचे आश्वासन देतय. पण अजूनही नुकसानग्रस्त झालेला शेतकरी, कोळी बांधव आणि सामान्य नागरिक मदतीच्या अपेक्षेत असलेला पाहायला मिळतो.