मुंबई -काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देशातील सर्व विरोधी पक्ष नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत राज्यात मागील काही दिवसांमध्ये स्थलांतरीत मजुरांसोबत सरकारकडून करण्यात आलेल्या चांगल्या कामगिरीची माहिती दिली जाणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात ही महिती देणार आहेत. कोरोनासाठी पुढील काळात काय उपाययोजना केल्या जाणार आहेत, हेही सांगणार असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही बैठक आज दुपारी ३ वाजता घेणार आहेत. या बैठकीला राज्यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना नेते संजय राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माकप नेते सीताराम येचूरी, राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव, झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन, द्रमुकनेते एम.के.स्टॅलिन, पीआरपीचे नेते जोगेंद्र कवाडे आदी नेते उपस्थित राहणार आहेत.