मुंबई - एकीकडे कोरोना, टाळेबंदीमुळे महापालिकेचे आर्थिक गणित बिघडले असताना पेंग्विनवर पुढील तीन वर्षासाठी 15 कोटींचा खर्च केला जाणार आहे, तशी निविदा पालिकेने काढण्यात आली आहे. हा कोट्यवधीचा खर्च का केला जात आहे, असा प्रश्न पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी उपस्थित केला आहे. तसेच काढण्यात आलेली निविदा रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. यावर खर्चाबाबत नक्की तोडगा काढला जाईल. मात्र, पेंग्विनबाबत तडजोड केली जाणार नाही, असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले आहे.
पेंग्विनवर कोट्यवधीचा खर्च
मुंबई महापालिकेच्या भायखळा येथील राणीबागेत 2017 मध्ये दक्षिण कोरियातून हम्बोल्ट पेंग्विन आणण्यात आले. त्यासाठी विशेष वातानाकुलित कक्ष उभारण्यात आला आहे. पेंग्विन खरेदीसाठी आणि या कक्षासाठी एकूण 25 कोटींचा खर्च झाला होता. त्यानंतर 3 वर्षांच्या देखभालीसाठी 11 कोटी खर्च झाले. त्यानंतर आता पुन्हा पुढच्या तीन वर्षांसाठी 15 कोटी खर्च अपेक्षीत आहे. निवीदा काढलेली रक्कम पेंग्विन प्रदर्शनाची देखभाल आणि वातानुकुलन सुविधा, लाइफ सपोर्ट आणि इलेक्ट्रिकल सिस्टीम, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा आणि पेंग्विनसाठी मासे, अन्न पुरवण्यासाठी खर्च केली जाईल. पेंग्विनच्या दररोजच्या देखभालीसाठी विशेष पशुवैद्यकीय अधिकारी आणि डॉक्टर्स नेमलेले आहेत. दररोज पेंग्विनसाठी विशेष खाद्य, विशेष प्रकारचे मासे आणि इतर सप्लीमेंटस् दिल्या जातात. गेल्या तीन वर्षात एक नवजात पिलू पेंग्विन आणि एका नर पेंग्विनचा मृत्यू झाला आहे.
टेंडर रद्द करा
पेंग्विन हे कंत्राटदारासाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. कंत्राटदाराला फायदा व्हायला पाहिजे यासाठी टेंडर काढण्यात आले आहे. राणीबागेतील आपले डॉक्टर आणि कर्मचारी परदेशातून आणल्या जाणाऱ्या पक्षी आणि प्राण्यांना कसे सांभाळायचे आहे. हे गेल्या तीन वर्षांत शिकले आहेत. कोरोना काळात पालिकेची आर्थिक परिस्थिती खराब झाली आहे. अशावेळी 15 कोटींचे टेंडर कशासाठी काढता, असा प्रश्न पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केला आहे. पेंग्विनच्या देखभालीसाठी काढण्यात आलेले टेंडर रद्द करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. राणीबागेत संचालक आहेत त्या ठिकाणी परदेशातून संचालक मागवावेत, असा टोला रवी राजा यांनी लगावला आहे.