मुंबई- राज्यात सातत्याने महिला अत्याचारात वाढ होते आहे. राज्य सरकारने बीडमधील प्रकरणात तातडीने लक्ष घालून कठोर कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नेकनूरजवळ असलेल्या येळंब घाट परिसरात 22 वर्षीय प्रेयसीला अॅसिड आणि पेट्रोल टाकून जाळल्याची दुर्दैवी घटना लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घडली होती. जखमी अवस्थेत त्या मुलीला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अखेर रविवारी दुपारी दोन वाजता तिचा उपचारादरम्यान बीडच्या जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकारावर फडणवीस यांनी संताप व्यक्त केला.
१२ तास पीडिता रस्त्यावर तशीच पडून होती
बीडमध्ये एका तरुणीला अॅसिड आणि पेट्रोल टाकून जाळले गेले, १२ तास ती रस्त्यावर तशीच पडून होती आणि तिचा मृत्यू झाला. ही घटना मानवतेला काळिमा फासणारी आहे, असे त्यांनी ट्विट करून म्हटले आहे.
प्रियकर फरार
नेकनूरजवळ असलेल्या येळंब घाट परिसरात 22 वर्षीय प्रेयसीला अॅसिड आणि पेट्रोल टाकून जाळल्याची दुर्दैवी घटना लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घडली होती. हा अमानुष प्रकार केल्यानंतर प्रियकर फरार झाला. धक्कादायक म्हणजे, तब्बल 12 तास ही तरुणी रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात तडफडत होती. पहाटे 3 वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. तेव्हापासून ही तरुणी रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका खड्ड्यात 12 तास पडून होती. घटनास्थळी पोलिसांनी पोहोचून पंचनामा केला आणि जखमी तरुणीला स्वत:च्या गाडीतून नेकनूरला नेले तिथून रुग्णवाहिकेने बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकारावरून अनेकांनी सोशल मीडियावर संतप्त भावना व्यक्त केली आहे.