मुंबई- राम मंदिराच्या निधी संकलनावर शिवसेनेकडून टीका केली जात आहे. पण, खंडणीखोरांना समर्पणनिधीतील भाव समजणार तरी कसा आणि मुख्यमंत्री हे निवडणुकीतील चौकावरील भाषण करतात, ते सदनामधील मुद्देसूद भाषण करत नाहीत अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांसमोर केली.
राज्यपालांच्या अभिभाषणाच्या उत्तरात मुख्यमंत्र्यांनी जे उत्तर सभागृहात दिले, त्यानंतर विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, राज्यपालांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर जी चर्चा झाली, त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री आपल्या तासभराच्या भाषणात सर्वत्र प्रवास करीत असताना महाराष्ट्रात मात्र येऊ शकले नाहीत. चीन, पाकिस्तान, अमेरिका, उत्तरप्रदेश, पंजाब, बिहार, काश्मीर आणि अगदी दक्षिणेपर्यंत ते गेले. पण, महाराष्ट्राबाबत मात्र ते बोलू शकले नाहीत. मुख्यमंत्र्यांना आता भरपूर दिवस झाले, पूर्वी ते नवीन होते. पण, चौकातील भाषण आणि सभागृहातील भाषण या दोन्हींतील अंतर त्यांना अजूनही समजलेले नाही. शेतकर्यांसंदर्भात एकही मुद्दा मांडू शकले नाही. बोंडअळी, विमा, वीजतोडणी कशावरही बोलले नाहीत. महाराष्ट्रातील लाखो शेतकर्यांची वीज तोडणार्या मुख्यमंत्र्यांना सिंधू सीमेवरील शेतकर्यांची चिंता आहे, असेही ते म्हणाले.