मुंबई - कुठेतरी पुण्यावर अन्याय होत आहे. मुंबईकडे लक्ष दिले जाते तितके पुण्याकडे दिले जात नाही. पुण्यामध्ये कुठलीही व्यवस्था नाही. राज्य सरकारने पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेला एक रुपया अनुदान दिले नाही. तरीही आज मुंबईपेक्षा पुण्यामध्ये जास्त चाचण्या होत आहेत. त्यामुळे त्याठिकाणी संसर्गाचा धोका कमी झाला आहे. सरकारने पुण्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सरकार पाडण्याची इच्छा नाही. सरकारच्या तीन चाकी ऑटोची चाके वेगवेगळ्या दिशेने आहेत. मात्र, त्यांनी मिळून जनतेची कामे करायला पाहिजे, असे म्हणत फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर निशाणा साधला.
आज कोरोनाच्या बाबतीत महाराष्ट्राची काय अवस्था आहे. सर्वात जास्त मृत्यू महाराष्ट्रात आहेत. ४२ ते ४३ टक्के मृत्यू राज्यात आहे. चाचण्या वाढवा, असे आम्ही वारंवार सांगत असतो. आम्ही सर्वात जास्त चाचण्या केल्या, असे सरकार सांगते. मात्र, महाराष्ट्र चाचण्यांमध्ये १९ व्या क्रमांकावर आहे. मुंबईचा मृत्यूदर साडेपाच टक्क्याच्या वर आहे. चाचण्या होत नाही. तुम्ही तुमच्या पैशानी चाचण्या करा, असे मुंबईत सांगितले जाते. मुंबईतील कोरोना आटोक्यात येण्यासाठी चाचण्या करणे गरजेचे आहे, असेही फडणवीस म्हणाले.