मुंबई : 'महाराष्ट्रात लव्ह जिहादची एक लाखापेक्षा जास्त प्रकरण समोर आल्याचे वक्तव्य महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेत केले होते. या प्रकरणावरून आता राजकारण तापू लागले असून मंगल प्रभात लोढा हे पूर्णतः खोटारडे आहे, ते खोटे बोलत आहेत', असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. तसेच 'जाती धर्माच्या नावावर आता महाराष्ट्रात राजकारण सुरू झाले. या प्रश्नावरून आता भाजपवर विरोधकांकडून प्रश्नांचा भडीमार सुरू आहे. अशा वक्तव्याने समाजामध्ये तेढ निर्माण होत असल्याचे सांगितले जात आहे. तसेच महत्त्वाच्या मुद्द्यांना बगल देऊन जाती धर्मावर राजकारण करण्याचा भाजपचा अजेंडा असल्याचे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले आहे.
जितेंद्र आव्हाड यांचा आरोप :लव्ह जिहाद प्रकरणावर बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, 'शिंदे - फडणवीस सरकार मध्ये मंगल प्रभात लोढा यांनी खोटे सांगितले आहे. महाराष्ट्राचे राजकारण लोढा हे खराब करत आहेत. निर्भया प्रकरण झाले, तेव्हा केंद्रात मनमोहन सिंग पंतप्रधान होते. मंगल प्रभात लोढा यांनी विधान सभेत राज्यात एक लाख लव जिहाद लग्न झाली असल्याचे सांगितले आहे. हे खोटे आहे. राज्यात १०० लग्न जरी लव्ह जिहादची झाली असतील तर मी एक लाख रुपये द्यायला तयार आहे. निर्भया प्रकरणानंतर काँग्रेसने प्रकरणातून अनेक धडे घेत त्यातून काय शिकलो हे त्यांनी कृतीतून दाखवुन दिले. भाजपने त्याचा वापर चुकीच्या पद्धतीने केला आहे. लोढा यांनी एक लाख लग्न लव्ह जिहादची झाली हे पुराव्यानिशी दाखवावे. इतके खोटे त्यांनी बोलू नये. हे फक्त मंगल प्रभात लोढा हेच करू शकतात. जाती धर्माच्या नावावर आता भाजपा राजकारण करत आहेत. लव जिहादच्या नावाने महाराष्ट्रात मुंबईच्या रस्त्यावर घेणाऱ्या हजारो लोकांच्या मोर्चाला फंडिंगसुद्धा मंगल प्रभात लोढा करत असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
नाना पटोले यांची लोढांवर टिका : मंगल प्रभात लोढा यांच्या वक्त्यावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, 'हा त्यांचा अजेंडा आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या उत्पादनाला दीडपट भाव देऊ असे सांगितले होते, परंतु त्यावर ते गप्प आहेत. शेतकऱ्यांना आत्महत्या करायला ते प्रवृत्त करत आहेत. बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून दिले जातील, असेही त्यांनी सांगितलं होते. पण त्यावर सुद्धा काही बोलायला ते तयार नाहीत. गरीबी दूर करण्याचे त्यांनी सांगितलं होतं, पण त्यामध्ये सुद्धा ते यशस्वी झाले नाहीत. जीएसटीच्या नावाने गरिबांच्या तोंडातील घास हिरकावून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. म्हणून आता यांच्याकडे काही मुद्दे राहिले नसताना, जे वचन यांनी दिले होते त्याबाबत आता जनता प्रश्न विचारेल. त्यासाठी अशा पद्धतीचा धार्मिक वाद निर्माण करून पुन्हा धर्माच्या नावावर मत घेता येतात का? असा प्रयत्न त्यांचा सुरू झालेला आहे. केंद्रात सत्ता त्यांची आहे. राज्यांमध्ये सत्ता त्यांची आहे. तसं पद्धतीचा काही मुद्दा असेल तर त्याची चौकशी त्यांनी केली पाहिजे. परंतु तसं न करता हिंदू संघटनेला पुढे आणून धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून चालू आहे. परंतु आता त्यामध्ये ते यशस्वी होणार नाहीत. महाराष्ट्रातील जनता सुजाण आहे. हुशार आहे. ते निवडणुकीमध्ये त्यांना उत्तर देतील. ज्या पद्धतीने कसब्या मध्ये दिलेल आहे', असेही नाना पटोले म्हणाले आहेत.
काय म्हणाले होते, मंगल प्रभात लोढा :सभागृहात आंतरधर्मीय विवाह, परिवार समन्वय समितीबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मंगल प्रभात लोढा म्हणाले होते की, 'राज्यभरात लव्ह जिहाद व महिला अत्याचार रोखण्यासाठी मोठ्या संख्येने मोर्चे निघत निघत असताना महिला सुरक्षा, सक्षमीकरणाच्या गोष्टी आपण करतो. पण राज्यात १ लाखांपेक्षा जास्त लव्ह जिहादची प्रकरणं समोर आल्याने समाजात अस्वस्थता आहे. अंतर जातीय धार्मिक विवाह बाबत स्थापन केलेल्या कमिटी विषयी मी काही बोलणार नाही. याबाबत आगपाखड करणाऱ्यांनी सरकारने बनवलेला जीआर अगोदर वाचावा त्यानंतर ते सांगतील तिथे मी येईन, असा थेट इशारा लोढा यांनी दिला आहे. शासनाच्या जीआरमध्ये एखाद्याच्या धर्म किंवा वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करेल, असा एकही शब्द नाही आहे. पण महाराष्ट्रात पुन्हा श्रद्धा वालकर हत्याकांड होऊ नये ही सरकारची जबाबदारी आहे. श्रद्धा वालकरचे तुकडे करणारा, तिला मारणारा कोण होता, मरणारी कोण होती म्हणून तो मुद्दा बनत नसून; लग्नानंतर ज्या मुलीचा आपल्या कुटुंबियांसोबत संपर्क तुटला आहे, तो पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न महिला बालविकास विभाग करेल, असेही लोढा म्हणाले होते.
हेही वाचा : Maharashtra budget 2023: खत अनुदानाकरिता जातीचा मुद्दा बनला कळीचा