मुंबई- सचिन वाझे यांच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस अनेक नवनवीन खुलासे होत आहेत. अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटकांनी सज्ज स्कॉर्पिओ आणि मनसूख हिरेन मृत्यू या प्रकरणाचा सचिन वाझे यांनीच संपूर्ण कट रचला आहे. या संदर्भातील सगळे पुरावे आता समोर आलेले आहेत. मात्र, असे असतानादेखील शिवसेना सचिन वाझेंना पाठीशी का घालत आहे? ही पाठराखण का केली जात आहे? असा सवाल करत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते दरेकर यांनी शिवसेना नेेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ते आजच्या सामनाच्या अग्रलेखावर प्रतिक्रिया देताना बोलत होते.
संजय राऊत वाझेंना पाठीशी का घालत आहेत-
शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी सचिन वाझे प्रकरणावरून विरोधकांवर निशाणा साधला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना दरेकर म्हणाले, संजय राऊत हे सचिन वाझेंची पाठराखण करण्यासाठी का आग्रही आहेत? हा मोठा प्रश्न मला पडलेला आहे. सचिन वाझे यांच्या पाठी जे कोणी राजकीय नेते आहेत, ज्यांचा वरदहस्त आहे, त्यांची नावे लवकरच बाहेर पडण्याची शक्यता आहे. एनआयए त्यांच्यावरती देखील योग्य पद्धतीने कारवाई करेल, अशी आम्हाला आशा आहे.