मुंबई - शरद पवार व अमित शाह यांच्यात अहमदाबाद येथे भेट झाल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून या भेटीचे खंडन करण्यात आले असले तरी, भाजपकडून ही भेट झाली असल्याचे संकेत देण्यात आलेले आहेत. या भेटीनंतर राजकीय समीकरणे बदलतील, असा इशारा भाजप नेत्यांकडून द्यायला सुरुवात झाली आहे. मात्र, या कथित भेटीच्या चर्चेमुळे केवळ महाराष्ट्रातच नाही तर पश्चिम बंगालमध्येही राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तविण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कथित भेटीच्या चर्चेमुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. मात्र, ही भेट झाली किंवा नाही याबद्दल अजूनही दोन्ही पक्षाकडून मतमतांतरे पाहायला मिळतात. या कथित भेटीचे अनेक राजकीय कंगोरे काढले जात आहेत. खास करून या कथित भेटीच्या चर्चेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ आहे. भारतीय जनता पक्षाकडून शरद पवार व अमित शाह यांची भेट झाल्याचे थेट कोणीही नाकारत नाही. तिथेच या भेटीमुळे येत्या काळात नवीन राजकीय समीकरणे पाहायला मिळतील, असे संकेत देखील काही भाजप नेत्यांकडून देण्यात आली. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तर, थेट दिल्लीचे पक्षश्रेष्ठी तो निर्णय घेतील, त्या निर्णयाची अंमलबजावणी महाराष्ट्रात केली जाईल, असे म्हटले आहे. तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते राम शिंदे यांनी "आगे-आगे देखो होता है क्या", असे म्हणत भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस युती येणाऱ्या काळात पाहायला मिळेल असेच जणू संकेत त्यांनी दिले.
शरद पवार व अमितशाह यांची भेट झालीच नाही.?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची कोणतीच भेट गुजरातच्या अहमदाबादमध्ये झाली नाही. केवळ अमित शाह व शरद पवार यांची कथीत भेट झाली असल्याचे चित्र तयार करून महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल राज्यात वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. शरद पवार व प्रफुल्ल पटेल हे उद्योगपती अडाणी यांच्या घरी असलेला लग्नसोहळ्याला जाणार होते. मात्र, रविवारी (28 मार्च) असलेल्या या लग्नसोहळ्यात शरद पवारांना जाता येणार नसल्याने ते एक दिवस आधी म्हणजेच शनिवारी (27 मार्च) अहमदाबादमध्ये गेले होते. मात्र, तेव्हाही शरद पवार व अमित शाह यांची भेट झाली नाही. कारण, अमित शाह हे 27 मार्चला गुजरातमध्ये नव्हते, तर शरद पवार हे 27 मार्चच्या सायंकाळी अहमदाबादमधून निघाले होते. त्यामुळे ही भेट झाली का? यावर शंका उपस्थित केली जाते असल्याचे मत राजकीय विश्लेषक प्रवीण पुरो यांनी मांडले आहे.