दिल्ली : महाविकास आघाडी सरकार पत्रकारपरिषदेत सचिन वाझेंचा बचाव करत होते. याचा काय अर्थ आहे? हेदेखील तपास यंत्रणांना शोधावे लागेल. सचिन वाझेंना ऑपरेट करणारे लोक सरकारमध्ये बसले आहेत, असा गंभीर आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसेच त्यांचा शोध घेणे गरजेचे आहे, अशी मागणीही त्यांनी केली. दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अँटिलिया प्रकरणी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह याची उचलबांगणी करण्यात आली. त्यांच्या जागी वरिष्ठ आयपीस अधिकारी हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
काय म्हणाले फडणवीस?
यावेळी फडणवीस म्हणाले की, सचिन वाझेंनी मनसुखकडून तक्रार नोंदविण्यास सांगितले. ज्या दिवशी मनसुखला रात्री एक फोन आला की गावडेने तुम्हाला बोलाविले आहे, तो तोच परिसर आहे, ज्या परिसरात वाझेंवर खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. गावडेंनी बोलविल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या मृत्यूची बातमी आली. मनसुख यांचा खून झाला आहे. पोलिसांच्या दबावात मनसुख यांचा मृतदेह वाहून गेला नाही. शवविच्छेदनाचा अहवाल पाहिला तर इतके रुमाल त्यांच्या तोंडात कसे आले. त्यांना दाबून बांधण्यात आले. त्यांच्या फुफ्फुसात पाणी नाही. जर खाडीतील पाणीत पडून ते मेले असते तर फुफ्फुसात पाणी असते. मात्र, त्यात पाणी नाही. त्यांचा खून झाला आहे, असा दावाही फडणवीसांनी केला.