महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपूर-शिर्डी समृद्धी महामार्गाचा टप्पा लवकर खुला करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी टप्प्यातील कामास गती देऊन लवरकरच वाहतुकीसाठी हा मार्ग खुला करावा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. समृद्धी महामार्ग, मुंबईतील वांद्रे-वर्सोवा सीलिंक या प्रकल्पांचा त्यांनी आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By

Published : Jun 18, 2021, 10:02 PM IST

मुंबई - बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी टप्प्यातील कामास गती देऊन लवरकरच वाहतुकीसाठी हा मार्ग खुला करावा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुंबई-नागपूर यांना जोडणारा समृद्धी महामार्ग, मुंबईतील वांद्रे-वर्सोवा सीलिंक यासह प्रस्तावित कोकण सागरी महामार्ग व कोकण 'एक्स्प्रेस'वे या प्रकल्पांचा आढावा घेतला. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, सचिव (बांधकाम) अनिल गायकवाड, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे आदी उपस्थित होते. दरम्यान, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी प्रकल्पांच्या माहितीचे यावेळी सादरीकरण केले.

'नागपूर ते शिर्डी टप्प्याचे ७२ टक्के काम पूर्ण'

नागपूर ते शिर्डी या टप्प्याचे ७२ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम वेगाने पूर्ण करण्यात यावीत. या मार्गाच्या परिसरात पेट्रोलपंप, वाहनचालकांसाठीच्या सुविधा निर्माण करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी केल्या. तसेच, इतर टप्प्यांची कामेही वेगाने पूर्ण करण्यात यावेत. यानंतर ऑगस्टमध्ये पुन्हा या कामाचा आढावा घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

'खाडींवरील सर्व पुलांच्या कामाला प्राधान्य द्या'

कोकण सागरी किनारा महामार्ग हा कोकणासाठी महत्त्वपूर्ण मार्ग आहे. हा महामार्ग चारपदरी करावा. त्यामुळे वाहतूक सुरक्षित होईल व पर्यटक वाढीसाठीही उपयोग होईल. त्याचप्रमाणे या महामार्गावरील खाडींवरील सर्व पुलांचे काम प्राधान्याने हाती घेण्यात यावेत. भूसंपादनाची कमीत कमी गरज भासेल, अशा प्रकारे कामाचे नियोजन करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.

'पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात महत्वपूर्ण भर पडेल'

मुंबईतील वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाचा आढावाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी घेतला. हे कामही लवकरात लवकर पूर्ण करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. कोकण द्रुतगती मार्गाच्या आरेखनाचा सविस्तर आढावाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतला. या प्रकल्पामुळे महाराष्ट्राच्या दळण-वळण, पर्यटन तसेच पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण भर पडणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

'विक्रमी वेळेत भूसंपादन'

समृद्धी महामार्गावर प्रवाशांसाठी सुविधा निर्माण करण्याचे काम सुरू असून, लवकरच ते पूर्ण करण्यात येईल. समृद्धी महामार्गाच्या ठाणे व नाशिक भागातील कामेही लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच, समृद्धी महामार्गासाठी विक्रमी वेळेत भूसंपादन झाल्याचेही ते म्हणाले.

'अपघात विरहित मार्ग बनवा'

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर दोन्ही बाजूने वनीकरण करण्यात यावे. या महामार्गावरील अपघातक्षेत्र कमी करून, हा मार्ग अपघात विरहित असावा, यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी केल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details