महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काँग्रेसची शिवसेनेला खुली ऑफर, भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसची नवी खेळी - विधानसभा निवडणूक २०१९

राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकिकडे बाळासाहेब थोरात पवारांच्या भेटीला गेले आहेत. तर दुसरीकडे मातोश्रीवर शिवसेनेची बैठक सुरु आहे. अशातच काँग्रेसने शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी खुली ऑफर दिली आहे.

काँग्रेसची शिवसेनेला खुली ऑफर

By

Published : Oct 26, 2019, 3:49 PM IST

मुंबई - विधानसभेत युतीपेक्षा आघाडीच्या जागा जरी जास्त आल्या असल्या तरी मुख्यमंत्री कोण होणार? हा मुद्दा चर्चेचा विषय ठरतोय. तर मुख्यमंत्री पदावरुन शिवसेनेने भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. अशातच आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या हालचालींनांही वेग आला आहे. काँग्रेसने तर शिवसेनेला सत्ता स्थापनेची खुली ऑफर दिली आहे.

सेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद हवे की पाट वर्ष
राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकिकडे बाळासाहेब थोरात पवारांच्या भेटीला गेले आहेत. तर दुसरीकडे मातोश्रीवर शिवसेनेची बैठक सुरु आहे. अशातच काँग्रेसने शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी खुली ऑफर दिली आहे. शिवसेनेचा जर प्रस्ताव आला तर आम्ही आमच्या हायकमांडशी बोलू असे वक्तव्य विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. शिवसेनेला अडीच वर्षाचे मुख्यमंत्रीपद हवे की ५ वर्षाचे. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय भाजपच्या कोर्टात आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेला अडीच वर्ष वाट बघावी लागणार असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.


भाजपला रोखायचे असेल तर सेनेने पुढे यायला हवे
भाजपला सत्तेपासून रोखायचे असेल तर शिवसेनेने पुढे आले पाहिजे. पण शिवसेनेने असा कुठलाही प्रस्ताव दिलेला नाही. भाजप सोडून सत्ता बनवली पाहिजे असे राज्यातील जनतेला वाटत आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं पाहिजे. पण यात शिवसेनेची भूमिका निश्चित झाली पाहिजे असेही वेडट्टीवार म्हणाले.


वंचित सोबत असती तर आम्ही सत्तेत असतो
शासकीय यंत्रणांचा वापर करून दबावाने विरोधकांना संपवण्याचे भाजपचे षडयंत्र होते. आम्ही ताकदीने लढलो असतो तर राज्यात परिवर्तन दिसले असते. वंचित सोबत असती तर आम्ही राज्यात सत्ता बनवू शकलो असतो, असेही वडेट्टीवार म्हणाले. त्यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी ही माहिती दिला. राज्यातील जनतेचे मी विरोधी पक्षनेता म्हणून आभार मानतो. राज्यातील जनतेची आघाडीला हातात सत्ता देण्याची मानसिकता होती. पण जनतेचा कौल समजायला आम्ही कमी पडल्याचे वडेट्टीवार म्हणाले.


सत्ता विरोधकांना संपवण्यासाठी राबवली तर लोक थारा देत नाहीत. या सरकारने अडीच लाख कोटीचे कर्ज साडेपाच लाख कोटीवर नेले आहे. अंगणवाडी सेविकांचे पगार मिळत नाहीत. राज्य डबघाईला गेलं आहे. सत्तेची गुर्मी कराल तर तुमची जागा दाखवू हा सुजाणपणा जनतेने दाखवून दिला आहे. राज्यातील जनतेनं दिलेला कौल मान्य करून उद्याचा महाराष्ट्र भाजपपासून सत्तामुक्त हवा आहे. सत्तेच्या पदावर भाजपला राहण्याचा अधिकार राहिला नाही. विरोधी पक्षाचे नेते आपल्या पक्षात घेतले. आमच्याही काही लोकांनी हलकटपणा दाखवला, सत्तेचा हावरटपणा दाखवला त्यांना जनतेनं जागा दाखवून दिल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details