मुंबई - सीएए आणि एनपीआरविरोधात मुंबईत चाललेल्या आंदोलनात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेचा कोणताही संबंध आढळून आला नाही. या आंदोलनात स्थानिक लोक सहभागी होते. या आंदोलनात भाषणे देण्यासाठी बाहेरून वक्ते आले होते. मात्र, त्यांच्याकडून जर भडकावू भाषणे झाली असतील तर त्यासंदर्भात ती भाषणे तपासून घेतली जातील, अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शनिवारी विधान परिषदेत दिली. विरोधी पक्षांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाच्या उत्तरात ते बोलत होते.
या आंदोलनात सहभागी होणारे लोक स्थानिकच आहेत. मात्र, तेथे भाषण करणारे लोक बाहेरचे असतात. हे वक्ते भडकावू भाषणे करत असतील तर त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. या आंदोलनकर्त्यांना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाकडून पैसा पुरवला जात असल्याचे आढळून आले नाही. तरीही या आंदोलकांना कोण पैसा पुरवतो याची चौकशी केली जाईल, असेही देसाई म्हणाले.
हेही वाचा -जुहू चौपाटीवर वाळू शिल्पातून कोरोना विषाणूची जनजागृती
रोह्यामध्ये गतीमंद मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात करीम नागीटकर याला अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास महिला पोलीस उपअधीक्षकांकडून केला जाईल. कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षकांच्या देखरेखीखाली या प्रकरणाची चौकशी होईल. तसेच महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी आंध्र प्रदेशच्या दिशा कायद्याच्या धर्तीवर कायदा बनविण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावले जाईल, असेही त्यांनी सांगितले. मुंबईच्या साकीनाका भागात तीन तर रायगड जिल्ह्यातल्या अर्नाळा येथे 22 बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे. अर्नाळात पकडलेल्या बांगलादेशींकडे ग्रामपंचायतीचे दाखले मिळाले आहेत. या दाखल्यांची सत्यता पडताळण्याचे काम चालू आहे.गेल्या चार वर्षांत राज्यात 3431 बांगलादेशींना आरोपी करण्यात आले. 603 बांगलादेशींना त्यांच्या देशात परत पाठवण्यात आले आहे, असेही शंभूराज देसाई यांनी सांगितले.