मुंबई : मुंबई महापालिकेने ( Mumbai Municipality) गेल्या काही वर्षात पर्यावरण रक्षणावर विशेष लक्ष दिले आहे. कोणत्याही कामामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये ( Environment should not be degraded ) असे उद्दिष्ट पालिकेने ठेवले आहे. याचाच एक भाग म्हणून कांजूरमार्ग येथील डम्पिंग ग्राउंडवर (Earth embankments ) मातीचे बंधारे बांधले जाणार आहेत. असे बंधारे बांधून समुद्री जीवांना तसेच पर्यावरणाला धोका निर्माण होणार नाही. अशी काळजी घेतली जात असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मात्र बंधारे बांधून पर्यावरणाचा प्रश्न सुटणार नसल्याने हे डम्पिंग ग्राउंड बंद करणे योग्य असल्याचे मत वनशक्ती संघटनेचे संचालक स्टॅलिन दयानंद यांनी व्यक्त केले आहे.
निरीया संस्थेने दिला हा अहवाल : मुंबईमधील गोळा केला जाणारा कचरा देवनार आणि कांजूरमार्ग येथील डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जातो. कांजूरमार्ग येथील डम्पिंग ग्राउंड ११८ हेक्टर आहे. त्यापैकी ५२.१५ जमीन सीआरझेड तीनमध्ये आहे. तर ६५.९६ हेक्टर जमीन सीआरझेड मुक्त आहे. डम्पिंग ग्राऊंडमध्ये जमा होणाऱ्या कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया न केल्यास समुद्राच्या, खाडीच्या भरतीच्या वेळी पाण्यामध्ये घातक व अपायकारक घटक पाण्यात गेल्यास त्यामुळे समुद्री जिवांना तसेच पर्यावरणाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून भरतीच्या पाण्या जवळच्या भागांमध्ये बंधाऱ्याचे काम प्राधान्याने घेणे आवश्यक आहे. जेणेकरून घातक व अपायकारक घटकांचा भरतीच्या पाण्यामध्ये प्रतिबंधित होईल. असा अहवाल निरीया संस्थेने उच्च न्ययालयच्या आदेशाने दिला आहे.
बंधारे बांधले जाणार : कचऱ्यामधील घातक व अपायकारक घटक खाडी मार्गे समुद्रात जाऊ नये म्हणून जीओसिन्थेटिक पर्यावरण पुरक मटेरियलचा वापर करून २ ते ३ मीटर रुंद आणि २ ते ४.५ मीटर उंचीचे बंधारे बांधले जाणार आहेत. यासाठी पालिका १९ कोटी रुपये खर्च करणार असून शेठ कन्स्ट्रक्शन या कंपनीला काम दिले जाणार आहे. हा भाग सीआरझेड मध्ये येत असल्याने बंधारे बांधण्यासाठी हे काम सीआरझेड क्षेत्रात येत असल्यामुळे तशी परवानगी घ्यावी लागणार आहे. संबंधित विभागाची परवानगी मिळताच कंत्राटदाराला कार्यादेश देऊन बंधारे बांधण्याचे काम सुरु होणार असल्याची माहिती पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
डंपिंग ग्राउंड बंद करावे :कांजूरमार्ग येथे डंपिंग ग्राउंड चुकीच्या जागेवर बांधण्यात आले आहे. भरतीचे पाणी ज्या ठिकाणी येते तो भाग सीआरझेड मध्ये येतो. पालिका मात्र हा भाग सीआरझेड नसल्याचे सांगते. या डम्पिंगवर कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जात नाही. भरतीच्या वेळी पाण्यात कचरा जाऊन तो अभयारण्यात पसरतो, कांदळवणात हा कचरा अडकतो. पृथ्वीवर अभयारण्यात असलेले एकमेव सर्वात मोठे डंपिंग ग्राउंड आहे. पालिका या जागेवर बंधारे बांधणार म्हणत आहे या निव्वळ गप्पा आहेत. त्याला काहीही अर्थ नाही. या डंम्पिंग ग्राऊंडची पाहणी उच्चस्तरीय समितीने पाहणी केल्यास ते एक दिवसही चालू शकणार नाही अशी भयकं परिस्थिती आहे. कचरा वाहून खाडीत जात आहे. त्यामुळे या विभागातील मच्छिमारी बंद झाली आहे. मच्छिमारांच्या व्यवसायावर त्याचा परिणाम झाला आहे. कांदळवन आणि पक्षांनाही याच त्रास होत आहे. यामुळे बंधारे बांधून काहीही होणार नाही. हे डंम्पिंग ग्राउंड बंद करावा अशी आमची मागणी असल्याचे वनशक्ती संघटनेचे संचालक स्टॅलिन दयानंद यांनी सांगितले.