मुंबई -सध्याच्या घडीला थोडा वेळ लागेल. मात्र, मुख्यमंत्री भाजपचाच होईल, असा विश्वास भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी व्यक्त केला आहे. ईटीव्ही भारत सोबत त्यांनी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
मुख्यमंत्री पदावरून महायुतीतल्या भाजप आणि शिवसेनेमध्ये चांगलीच जुंपली आहे. शिवसेना मुख्यमंत्री पदावर ठाम आहे. तर दुसरीकडे भाजप नेते ही आक्रमकपणे आपली बाजू लावून धरत असल्याचे चित्र आहे. विरोधीपक्ष नेते विजय वड्डेटीवर यांनी भाजपवर घोडेबाजाराचा गंभीर आरोप केला आहे. यावर सोमैय्या यांना विचारले असता ते म्हणाले की, भाजप महायुतीत आवश्यक त्या संख्या बळावर सरकार बनवेल, आम्हाला घोडेबाजार करण्याची आवश्यकता नाही. तर काही लोकांना चर्चेत राहण्यासाठी, असे आरोप करावे लागतात असा टोलाही त्यांनी वड्डेटीवार यांना लगावला.