मुंबई -'काँग्रेस, राष्ट्रवादी सरकारमध्ये ओबीसी आणि धनगर समाजाची अवस्था बिकट होती. पण भाजप सरकारने समाजाला राजकीय वाटा दिला आहे. मोदी आणि फडणवीस हेच धनगरांचे प्रश्न सोडवतील', असे मत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व पशु संवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केले आहे. राष्ट्रीय समाज पक्षाच्या 16 व्या वर्धापन दिनानिमित्त दादर येथे आयोजित महामेळाव्यात ते बोलत होते.
मराठा आरक्षण प्रश्न सरकारने सोडवला. आता धनगरांना देखील हेच सरकार आरक्षण देऊ शकेल, असा विश्वास जानकर यांनी व्यक्त केला. धनगर समाजासाठी भाजप सरकारने 22 योजना लागू केल्या आहेत. त्याअंतर्गत 1000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहितीदेखील त्यांनी दिली.