मुंबई- घर खरेदीदारांसह बिल्डरांना राज्य सरकारने अखेर मोठा दिलासा दिला आहे. घराची नोंदणी आणि मुद्रांक शुल्क भरण्यासाठी आता ग्राहकांना तसेच बिल्डरला नोंदणी कार्यालयात जाण्याची गरज नाही. कारण आता बिल्डरच ऑनलाईन नोंदणी आणि मुद्रांक शुल्क भरण्याची प्रक्रिया पार पाडणार आहेत. बिल्डरला कुठेही न जाता ऑफिसमध्ये बसूनच हे काम करता येणार आहे.
सरकारच्या निर्णयावर बिल्डरांनी समाधान व्यक्त केले आहे. कोरोनामुळे दोन महिने प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन नोंदणी करणे आणि मुद्रांक शुल्क भरणे बंद होते. तर, यातून सरकारला मोठा महसूल मिळत असल्याने लॉकडाऊनदरम्यान ही प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली. पण, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे, महिन्याभरापूर्वी मुंबईतील 10 कार्यालये सुरू करत ही प्रक्रिया सुरू केली. त्याबरोबर महसूल आणि दस्त नोंदणी वाढली.
ग्राहकाला ऑनलाईन नोंदणी त्रासदायक वाटत असल्याने ऑनलाईनला प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, कार्यालयात जाऊन ही प्रक्रिया पार पाडणे कोरोनाच्या काळात धोकादायक आहे. हीच बाब लक्षात घेत एका वेबिनारमध्ये बिल्डरांनी आपल्याला ग्राहकांच्या घरांची ऑनलाईन नोंदणी करत मुद्रांक शुल्क भरण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली होती.
ही मागणी अखेर त्यांनी मान्य करत ऑनलाईन नोंदणीसाठी परवानगी दिली आहे. त्यानुसार आता प्रत्येक बिल्डरला संबंधित नोंदणी कार्यालयाकडून यासाठी मान्यता घ्यावी लागेल. त्यानंतर पुढची प्रक्रिया पार पाडत बिल्डर ऑफिसमध्ये बसून ऑनलाईन नोंदणी आणि मुद्रांक शुल्क भरू शकेल. राज्यात अशी पहिली परवानगी नवी मुंबईतील प्रजापती समूहाला देण्यात आली आहे. त्याप्रमाणे आता त्यांच्या गोवंडी आणि पनवेल कार्यालयातील नोंदणी-मुद्रांक शुल्क प्रक्रिया ते ऑनलाईन पध्दतीने पूर्ण करणार आहेत, अशी माहिती प्रजापती समूहाचे सर्वेसर्वा राजेश प्रजापती यांनी दिली आहे. दरम्यान, नोंदणी आणि मुद्रांक शुल्क कार्यालयाकडून आता यादृष्टीने तयारी सुरू करण्यात आली आहे. येत्या 15 दिवसात यासाठीच्या सुविधा उपलब्ध करून देत या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात येणार आहे.