मुंबई - अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येला एक आज वर्ष पूर्ण होत आहे. अद्यापही सुशांत सिंहने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. १३ जून २०२० ते आजतागत या प्रकरणात विविध खुलासे, चौकशी आणि प्रकरणे बाहेर आली. मात्र आजही या प्रकरणाचा निकाल लावण्यात प्रशासनाला यश आलेले नाही.
१३ जूनची रात्र आणि १४ जूनच्या सकाळी सुशांत सिंह निवास्थानी नेमकं काय घडले ?
13 जूनच्या रात्री सुशांत जेवलाच नाही. सुशांतचा नोकर दिपेशने त्याला जेवणासाठी विचारणा केली मात्र सुशांतने जेवण्यास नकार दिला. जेवणाऐवजी मँगो मिल्क शेक मागवला. दिपेशने सुशांतला मॅंगो मिल्क शेक दिला. सुशांतने यावेळेस सगळ्यांना जेवण्यास सांगितले. दीपेशने स्वतःचे जेवण उरकून घेतले. काही वेळ मोबाईल चाळल्यानंतर त्याने सुशांतला फोन केला. मात्र सुशांतने त्याचा फोन उचलला नाही. साहेब झोपले असतील असे गृहीत धरून दीपेश झोपी गेला. 14 जूनला पहाटे दीपेश उठला. नेहमीची कामे आटपून दीपेश सुशांतच्या खोलीत गेला. यावेळेस सुशांत बेडवर उठून बसला होता. दिपेशने नेहमीप्रमाणे चहा आणि नाश्ता याबद्दल विचारले. सुशांतने चहा आणि नाश्ताला ही नकार दिला. थोड्या वेळाने जेवण बनवणारा केशव आणि नीरज दोघेही उठले. काही वेळाने सुशांत बेडरूमच्या बाहेर आला आणि केशवकडे थंड पाण्याची मागणी केली. केशवने सुशांतला थंड पाणी आणून दिले. जवळपास एका तासाच्या अंतराने सुशांतला फळांचा रस घेऊन केशव त्याच्या बेडरूममध्ये गेला. हीच काय ती सुशांतची शेवटची भेट.
आणि सुशांत आढळला लटकलेल्या अवस्थेत -
थोड्या वेळानंतर केशव जेवणासाठी काय बनवायचे हे विचारण्यासाठी सुशांतच्या खोलीकडे गेला. मात्र सुशांतची खोली आतून बंद होती. नोकराने दरवाजा वाजवला मात्र सुशांतने काही प्रतिसाद दिलाच नाही. या दिवशी सुशांतचा मित्र सिद्धार्थ पीठानी हा देखील सुशांत सोबत त्याच्या घरात राहत होता. सिद्धार्थ पीठानीने अनेकदा क्रिएटिव्ह आर्ट डिझायनर असल्याचे सांगितले आहे. दिपेशने सिद्धार्थला सुशांतचा दरवाजा बंद असल्याचे सांगितले. तिथे उपस्थित असलेले सिद्धार्थ, केशव, दीपेश आणि नीरज यांनी सुशांतच्या बेडरुमचा दरवाजा वाजवण्यास सुरुवात केली मात्र आतून काही प्रतिसाद येत नव्हता. दरम्यान सुशांतच्या बहिणीला देखील या प्रकाराची माहिती देण्यात आली. सुशांतच्या बहिणीने दरवाजा वाजवत राहा असे सांगितले. सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडालाही फोन करण्यात आला. दरवाजा लॉक असल्याने चावीवाल्याच्या मदतीने उघडण्याचे ठरले, याची कल्पना सुशांतच्या बहिणीलाही देण्यात आली. सिद्धार्थने गुगलवर चावीवाल्याचा नंबर शोधला. चावीवाल्याने दोन हजार रुपये चावी बनवण्यासाठी मागितले. चावीवाला आला त्याने दरवाजा उघडला त्याला पैसे देण्यात आले आणि तो निघून गेला. चावीवाला गेल्यानंतर दिपेश आणि सिद्धार्थ सुशांतच्या बेडरूममध्ये गेले बेडरुमच्या लाईट्स बंद होत्या. खिडक्या पडद्याने झाकल्या होत्या. खोलीमध्ये अंधार होता. लाइट्स लावण्यात आल्या आणि समोर सुशांत लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. घडल्या प्रकाराची माहिती सिद्धार्थने सुशांतची बहिण मितुला फोनवरुन दिली. केशव आणि नीरज तोपर्यंत सुशांतच्या बेडरूम बाहेरच होते. सिद्धार्थने 108 नंबरला फोन करून डॉक्टर आणि ॲम्बुलन्सची मागणी केली. सिद्धार्थला सुशांतच्या बहिणीचा फोन आला. बहिणीच्या पतीने सिद्धार्थला सुशांतला खाली उतरण्यास सांगितले आणि त्याचा श्वास तपासण्यास सांगितले. सुशांतला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यापूर्वीच सुशांत मृत्यू झाला होता.
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडे -
सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिसांकडून आत्तापर्यंत 56 जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी सुशांतवर उपचार करणाऱ्या मानसोपचारतज्ज्ञाचाही जबाब नोंदवला. सुशांतने निराशेतून हे पाऊल उचलल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. मृत्यूपूर्वी सुशांत सिंह राजपूत गुगलवर मानसिक आजार, स्वतः विषयीच्या बातम्या, दिशा सालियन याविषयी सर्च करत होता. याच अनुषंगाने मुंबई पोलिसांचा तपास सुरू होता. दरम्यान सोशल मीडियावर सुशांत सिंह राजपूतची हत्या करण्यात आली आहे अशा स्वरूपाच्या पोस्ट व्हायरल होऊ लागल्या. या संपूर्ण तपासात मुंबई पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली. समाज माध्यमांवर दिशा आणि सुशांत यांच्या मृत्यूबाबत अनेक पोस्ट फिरू लागल्या. या सगळ्या पोस्ट संशयास्पद माहिती पुरवणाऱ्या होत्या. त्यातच सुशांतच्या कुटुंबियांनी मुंबई पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त केला त्यामुळे या प्रकरणाचे गुढ आणखी वाढतच गेले.
विरोधी पक्षांकडून सुशांतसिंह मृत्यू प्रकरणात केलेला दावा -
सुशांतचा मृत्यू ही आत्महत्या नाही तर त्याची हत्या केली आहे, असा दावा विरोधी पक्षांकडून करण्यात आला यामध्ये प्रामुख्याने नारायण राणे यांनी शिवसेनेच्या एका नेत्यावर आरोप केले. पुन्हा त्यांच्या आरोपाचा रोख शिवसेनेच्या एका नेत्यावर होता. तसेच सुब्रमण्यम स्वामी यांनी देखील सुशांतसिंहची हत्या झाली आहे असे म्हटले होते. सुशांतच्या कुटुंबीयांनी सुशांतला विष देऊन नंतर गळफास दिलाय असा आरोप केला. या प्रकरणात अनेक दावे प्रतिदावे करण्यात आले.
एम्सकडून देण्यात आलेला रिपोर्ट -
या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला. सीबीआयला दिल्लीतील एम्सने या प्रकरणाचा अहवाल सादर केला. या अहवालानुसार एम्सच्या डॉक्टरांनी सुशांतची हत्या झाली असावी, या शक्यतेला छेद दिला. हत्या झाली नाही हे डॉक्टरांनी स्पष्ट केले. तिच्या गळ्यावर गळफास घेतल्यानंतरचे मार्क आणि पोस्टमार्टममध्ये नोंदवण्यात आलेली मृत्यूची वेळ या तर त्यानुसार सुशांतची हत्या झाली असे म्हणता येणार नाही, असे डॉक्टरांच्या अहवालात स्पष्ट केले.
सुशांतच्या घरी पार्टी होती? त्या पार्टीत युवा नेता होता? -