मुंबई - दिवाळीच्या सणाला मुंबईत करीरोड नाक्यावरील मुंबई दरबार हॉटेलबाहेर लावलेल्या फटाक्यांच्या विक्रेत्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत एकजण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर केईएम रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी एन.एम जोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी विठ्ठल सुके (55) अद्याप पोलिसांना सापडला नाही. एन.एम जोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रमोरे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना ही माहिती दिली आहे.
firecrackers sellers: फटाके व्यापाऱ्यांमध्ये बेदम हाणामारी, एकजण गंभीर जखमी - फटाके व्यापाऱ्यांमध्ये बेदम हाणामारी
दिवाळीच्या सणाला मुंबईत करीरोड नाक्यावरील मुंबई दरबार हॉटेलबाहेर लावलेल्या फटाक्यांच्या विक्रेत्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत एकजण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर केईएम रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
करी रोड नाक्यावरील शिवस्मृती इमारती खाली दिवाळीच्या फटाक्यांचे दोन स्टॉल लागले होते. त्यानंतर दिवाळीच्या पहिल्या दिवशी दोन्ही फटाके विक्रेत्यांमध्ये जीवघेणी हाणामारी झाली. या हाणामारीत विठ्ठल सुके याने चेतन नावाच्या तरुणावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात चेतन गंभीर जखमी झाला. चेतन हा करी रोड येथील शिवकृपा इमारतीत राहणारा असून विठ्ठल सुके हा आरोपी शिवस्मृती इमारतीत राहणारा असल्याची माहिती एन. एम जोशी पोलिसांनी दिली आहे.
एन. एम. जोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रमोरे यांनी सांगितले की, जखमी चेतन आणि आरोपी विठ्ठल सुके यांच्यात जुने वाद होते. त्यामुळेच पूर्व वैमानस्यातून विठ्ठल सुके यांनी चाकूने चेतनच्या गळ्यावर वार केले. दोघांनाही अमली पदार्थाचे व्यसन असल्याची माहिती चंद्रमोरे यांनी दिली. फरार आरोपी विठ्ठल सुके याचा पोलीस शोध घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दिवाळी सुरू होण्यापूर्वीच पोलीस उपायुक्त लाटकर यांनी फटाके विक्रेत्यांना पोलिसांच्या परवानगीशिवाय तसेच, संबंधित परवानगीशिवाय फटाक्याचे स्टॉल लावण्यास मनाई केली होती. त्यामुळे या दोन फटाके स्टॉल धारकांना पोलिसांनी परवानगी दिली होती का? असा स्थानिक रहिवाशी सवाल विचारत आहेत.