मुंबई: मुंबईत आता अमली पदार्थांचा वापर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. या पार्श्वभूमीवर एनसीबीने मोठी कामगिरी केली आहे. 20 जूनला फॉरेन पोस्ट ऑफिस मुंबई येथून 996 ग्राम (अंदाजे 2000 गोळ्या) MDMA जप्त करण्यात एनसीबीला यश मिळाले होते. नेदरलँड्समधून आलेले ड्रग्ज कॅनमध्ये लपवून ठेवण्यात आले होते. या प्रकरणाचा पाठपुरावा कारवाईमुळे 26 जून नायजेरियन व्यक्तीला अटक करण्यात आली. अटक केलेल्या नायजेरियनवर यापूर्वी एनसीबी मुंबईने गुन्हा दाखल केला होता. जप्त केलेले ड्रग्ज डार्कनेट आणि क्रिप्टोकरन्सी पेमेंटद्वारे मागवले होते. ड्रग्जच्या खरेदीसाठी वापरलेली बनावट कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांची तस्करी : सखोल तपासानंतर एनसीबी मुंबईने आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या सिंडिकेटला मोठा दणका दिला आहे. ज्यामध्ये फॉरेन पोस्ट ऑफिस मुंबई येथून एका पार्सल खेपातून एकूण 996 ग्रॅम MDMA वजनाच्या सुमारे 2000 गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. डार्कनेटद्वारे ऑर्डर केलेल्या अंमली पदार्थांच्या खरेदीमध्ये आफ्रिकन सिंडिकेटचा सहभाग होता, अशी प्राथमिक माहिती आहे. त्यानुसार विविध गुप्तचर यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.
एकूण 2000 गोळ्या आढळल्या : नेदरलँडमधून टिन कॅनमध्ये लपवून पार्सल मोडद्वारे औषधांची एक खेप मागवण्यात आली. त्यानुसार विविध ड्रॉप पॉइंट्सवर करडी नजर ठेवण्यात आली होती. 20 जूनला फॉरेन पोस्ट ऑफिस, मुंबईकडून एका पार्सलमधील सामग्रीबद्दल एनसीबीला माहिती देण्यात आली. पार्सल उघडले असता, गुलाबी, पिवळ्या आणि हिरव्या रंगाच्या सुमारे 2000 गोळ्या आढळल्या. त्या गोळ्यांची तपासणी केली असता, त्या MDMA असल्याचे आढळून आले. ज्याचे वजन एकूण 996 ग्रॅम आहे. हे पार्सल मागवणाऱ्याच्या शोधासाठी तपास सुरू करण्यात आला.