महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 8, 2020, 6:55 AM IST

ETV Bharat / state

कोरोनाचा फटका : देशातील व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या १७९ महाविद्यालयांचा संस्था बंद करण्यासाठी अर्ज

कोरोना आणि त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा अंदाज घेत देशातील अभियांत्रिकीच्या ७२, एमबीए ५८ तर डिप्लोमाच्या ७१ महाविद्यालयांनी ते बंद करण्यासाठी अर्ज केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील २२ महाविद्यालयांचा समावेश आहे.

AICTE
अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद

मुंबई - मागील काही वर्षांत विविध कारणांमुळे अडचणीत सापडलेल्या‍ देशातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. अभियांत्रिकी, व्यवस्थापन, औषधनिर्माणशास्त्र आणि इतर व्यावसायिक अभ्यासकमांच्या १७९ महाविद्यालयांनी आपल्या संस्था चालवणे शक्य नसल्याचे सांगत त्या बंद करण्याची परवानगी आल्याला द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेकडे केल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे यंदा नव्याने मान्यता मिळालेल्या १६४ महाविद्यालयांनी कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन या शैक्षणिक वर्षांत आपली महाविद्यालये सुरू करण्यास परिषदेला नकार कळवला आहे.

देशभरात अखिल भारतीय तंत्र शिक्षण संस्थेची मान्यता असलेल्या सुमारे १७९ व्यावसायिक महाविद्यालयांनी आपले महाविद्यालय आणि व्यावसायिक अभ्यासक्रमच पूर्णपणे बंद करण्याची परवानगी मागितली आहे. यात सर्वाधिक महाविद्यालये उत्तर प्रदेशतील ३१ आणि त्याखालोखाल तामिळनाडू आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी २२ महाविद्यालयांचा समावेश आहे. राज्यातून व्यावसायिक म‍हाविद्यालये बंद करण्याची मागणी ही पुणे, औरंगाबाद आणि मुंबई परिसरातील हे महाविद्यालय असल्याचे समोर आले आहे. या मागणीमुळे राज्यात , अभियांत्रिकी, व्यवस्थापन, औषधनिर्माणशास्त्र आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या जागा कमी होणार आहेत.

कोरोनाने महाविद्यालयांपुढे मोठे संकट

देशात आणि राज्यातही मागील दहा वर्षांच्या कालावधीत अभियांत्रिकी आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल कमी झाल्याने जागा प्रचंड मोठ्या प्रमाणात रिक्त राहत आहेत. त्यातच अभियांत्रिकीची पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी कमी होत असल्याने याचा परिणाम जागा रिक्त होण्यावर होत आहे. यामुळे अभियांत्रिकी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये रिक्त राहणाऱ्या जागांची मोठी समस्या बनली असतानाच आता कोरोनामुळे देशातील आणि राज्यातील व्यावसायिक म‍हाविद्यालयांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे.

व्यावसायिक शिक्षणावर असा होईल परिणाम

कोरोना आणि त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा अंदाज घेत देशातील अभियांत्रिकीच्या ७२, एमबीए ५८ तर डिप्लोमाच्या ७१ महाविद्यालयांनी ते बंद करण्यासाठी अर्ज केला आहे. यामुळे ३४ हजार ५५३ जागा कमी होणार आहेत. याचबरोबर काहींनी वर्ग खोल्या कमी केल्या आहेत. ७६२ संस्थांमधील सुमारे ६९ हजार ९६५ जागांची कपात होणार असल्याने याचा मोठा फटका संस्थांना बसणार आहे.

४४ महाविद्यालयांनी केलेला अर्ज मागे घेतला असल्याने त्यांच्याकडे उपलब्ध होणाऱ्या ८ हजार ८३२ जागा कमी होणार आहेत. देशातून तुकडीवाढीसाठी १ हजार ३११ महाविद्यालयांनी अर्ज केला होता. त्यामुळे तबब्ल १ लाख ०२ हजार ३९७ जागा उपलब्ध होणार होत्या. देशात ७६२ महाविद्यालयांनी आपल्याकडील ६९ हजार ९६५ जागा यंदा कोरोनामुळे कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

यांनी दिला यंदा महाविद्यालय सुरू करण्यास नकार

कोरोनाच्या कालावधीतही देशभरातून यंदा अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने १६४ नवीन संस्थांना विविध प्रकारच्या अभ्यासक्रमांची महाविद्यालये सुरू करण्याची मान्यता दिली होती. तर तब्बल एक हजार ३११ महाविद्यालयांना आपल्याकडे असलेल्या जागा त्यांच्या मागणीप्रमाणे वाढविण्यासाठी मान्यता दिली होती. परंतु,कोरोनाच्या काळात नवीन मान्यता आणि जागा वाढविण्याची परवानगी मिळूनही या महाविद्यालयांनी या शैक्षणिक वर्षांत आपल्याकडील अभ्यासक्रम सुरू करण्यास नकार दिला असल्याचे परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details