मुंबई-गेले दोन दिवस मुंबईला मुसळधार पावसाने झोडपले आहे. मुंबईची तुंबई झाली असताना दुसरीकडे या पावसाचा मोठा फटका झाडांना बसला आहे. बुधवारी दिवसभरात मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्यामुळे 150 झाडे उन्मळून पडल्याची माहिती मुंबई महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. पर्यावरणप्रेमींनी मात्र पालिका झाडांची योग्य ती काळजी घेत नसल्याने झाडे कमकुवत होत चालली असून अशीच झाडे पावसात पडत असल्याचे म्हणत नाराजी व्यक्त केली आहे.
गेल्या 46 वर्षातील विक्रमी पाऊस बुधवारी मुंबईत झाल्याचे सांगितले जात आहे. 1974 मध्ये एका दिवसात 264 मिमी पाऊस पडला होता. तिथे बुधवारी एका दिवसात 296 मिमी पाऊस पडला. या पावसाचा मोठा फटका मुंबई शहर आणि उपनगरातील झाडांना बसला आहे. बुधवारी मुंबईत झाडे उन्मळून पडण्याच्या एकूण 150 घटना घडल्याचे सुरेश काकाणी यांनी सांगितले आहे. दरम्यान, 150 पैकी 140 झाडे घटनास्थळावरून आतापर्यंत हटवण्यात आली असून 10 झाडे हटवण्याचे काम सुरू आहे. बुधवारी पाऊस खूपच जास्त होता आणि ताशी 100 किमी वेगाने वारे वाहत होते. परिमाणी झाडे मोठ्या संख्येने पडल्याचेही सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले आहे.