महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत एक कोटी लसींच्या ग्लोबल टेंडरसाठी चार कंपन्यांचा प्रतिसाद - मुंबई लसीकरण

लसीचा पुरवठा होत नसल्याने पालिकेने ग्लोबल टेंडर काढून लस खरेदी करावी, अशी मागणी राजकीय पक्षांकडून करण्यात आली आहे. ग्लोबल टेंडर काढण्यासाठी मागणी जोर धरू लागल्याने महापालिकेने एक कोटी लसीचा पुरवठा करू शकतील, अशा कंपन्यांकडून लस पुरवठा करण्याबाबत स्वारस्य असल्याचे प्रस्ताव मागवले आहेत. त्याला भारतातील दोन तर इंग्लंडमधील दोन अशा एकूण चार कंपन्यांनी प्रतिसाद दिल्याची माहिती जाधव यांनी दिली आहे.

मुंबई लसीकरण
मुंबई लसीकरण

By

Published : May 20, 2021, 12:21 AM IST

मुंबई - मुंबईत लसीचा तुटवडा जाणवत असल्याने पालिकेने एक कोटी लसीसाठी ग्लोबल टेंडर काढले आहे. याला भारतातील दोन तर इंग्लंडमधील दोन अशा एकूण चार कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. यामुळे लवकरच पुरेशा लसींचा साठा उपलब्ध होऊन प्रत्येक मुंबईकर नागरिकाला लसीचा डोस मिळेल, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली आहे.

लसीचा तुटवडा, ग्लोबल टेंडरची मागणी

मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण सुरू आहे. 16 जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. आतापर्यंत 28 लाखाहून अधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत. मुंबईत रोज 30 ते 50 हजार लसीचे डोस दिले जातात. मात्र लसीचा पुरवठा करणाऱ्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लसीचा पुरवठा कमी होत असल्याने लसीकरण अनेक वेळा बंद ठेवावे लागले आहे. लसीचा पुरवठा होत नसल्याने पालिकेने ग्लोबल टेंडर काढून लस खरेदी करावी, अशी मागणी राजकीय पक्षांकडून करण्यात आली आहे. ग्लोबल टेंडर काढण्यासाठी मागणी जोर धरू लागल्याने महापालिकेने एक कोटी लसीचा पुरवठा करू शकतील, अशा कंपन्यांकडून लस पुरवठा करण्याबाबत स्वारस्य असल्याचे प्रस्ताव मागवले आहेत. त्याला भारतातील दोन तर इंग्लंडमधील दोन अशा एकूण चार कंपन्यांनी प्रतिसाद दिल्याची माहिती जाधव यांनी दिली आहे.

'मे महिन्यात निविदा प्रक्रिया पूर्ण करणार'

मुंबईत सुमारे 1 कोटी 30 लाख लसीचे डोस लागणार आहेत. आतापर्यंत सुमारे 28 लाखाहून अधिक डोस देण्यात आले आहे. यामध्ये पहिल्या आणि दुसर्‍या डोसचा समावेश आहे. त्यामुळे एक कोटी डोसच्या निविदेची प्रक्रिया एका महिन्यात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य ठेवून पालिकेने कार्यवाही सुरू केली आहे. दरम्यान, पालिकेने जाहीर केलेल्या निविदेच्या अटी-शर्तींनुसार अनिवार्य कागदपत्रांची पूर्तता संबधित कंपन्यांना करावी लागणार आहे. मात्र प्रतिसाद दिलेल्या कंपन्यांकडे काही कागदपत्रांची कमतरता आहे. शिवाय इतर अटींबाबतही वाटाघाटी करणे आवश्यक आहे. त्यामुळे चर्चेसाठी जाहीर केलेल्या मुदतीला एक आठवड्याची मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती जाधव यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details