मुंबई - मुंबईमध्ये कोरोना विषाणूचा गेले दीड वर्षे प्रसार आहे. हा प्रसार कमी करण्यासाठी 16 जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू आहे. गेल्या साडे आठ महिन्यात मुंबईने एक कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला आहे. शनिवारीपर्यंत (दि. 4 सप्टेंबर) 1 कोटी 2 लाख 39 हजार 865 लाभार्थ्यांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत 58 लाख 17 हजार 281 पुरुषांना तर 44 लाख 20 हजार 226 महिलांना लस देण्यात आली आहे.
1 कोटी लसीचा टप्पा ओलांडला
मुंबईत 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू आहे. केंद्र सरकारच्या कोव्हिन ऍपवरील नोंदी प्रमाणे 4 सप्टेंबरला महापालिका, राज्य आणि केंद्र सरकारची 337, तर खासगी 202 अशी एकूण 549 केंद्रांवर 1 लाख 78 हजार 879 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. यामुळे मुंबईने साडेआठ महिन्यात एक कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला आहे. आजपर्यंत एकूण 1 कोटी 2 लाख 39 हजार 865 लाभार्थ्यांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. त्यात 73 लाख 6 हजार 648 लाभार्थ्यांना पहिला तर 29 लाख 33 हजार 217 लाभार्थ्यांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत.
पुरुषांची संख्या अधिक
1 कोटी 2 लाख 39 हजार 865 लाभार्थ्यांपैकी 58 लाख 17 हजार 281 पुरुषांना तर 44 लाख 20 हजार 226 महिलांना लस देण्यात आली आहे. 18 ते 44 वयातील 52 लाख 57 हजार 541, 45 ते 60 वर्षामधील 30 लाख 45 हजार 688 तर 60 वर्षांवरील 19 लाख 36 हजार 636 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. मुंबईत कोव्हिशिल्डचे 92 लाख 79 हजार 929, कोवॅक्सिनचे 9 लाख 26 हजार 248 तर स्फुटनिक व्हीचे 33 हजार 688 डोस देण्यात आले आहेत.